परभणीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालकांची पैशांसाठी पिळवणूक केली जात असल्याची घटना परभणी जिल्ह्यात समोर आली आहे. मुलीची शाळेत भरलेली फी आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट मागायला गेलेल्या पालकाला संस्थाचालकानं बेदम मारहाण केली. त्यात पालकानं आपला जीव गमावला. विशेष म्हणजे ही शाळा हिंगोली जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापतींची आहे.
परभणीतील हायटेक रेसिडेन्शियल स्कूल…या शाळेत निवासी वसतीगृह असून यामध्ये अनेक विद्यार्थी वास्तव्याला आहेत. मात्र, परभणीच्या उखळद गावची पल्लवी वसतीगृहात करमत नसल्यानं गावी निघून गेली. मुलीला पुढील शिक्षण हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमध्ये करायचं नसल्यानं तिच्या पालकांनी टीसी आणि फीची मागणी प्रशासनाला केली. मात्र संस्थाचालकाकडून पालकाला बेदम मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीत पालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
परभणीतील हायटेक रेसिडेन्शियल स्कूल हिंगोली जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापतींची आहे. आपल्या मुलीची टीसी आणि फी मागण्यासाठी आलेल्या पालकांना संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि रत्नमाला चव्हाण यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये मुलीचे वडील जगन्नाथ हेंगडे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संस्थाचालकांविरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिक्षणासारख्या पवित्र ज्ञान मंदिरात आपल्या पतीचा जीव घेणा-या संस्थाचालकांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी जगन्नाथ हेंगडेंच्या पत्नीनं केली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत निवासी गुरुकुल शिक्षण पद्धती निर्माण झाल्यात.. अनेक शाळा पालकांची पैश्यांसाठी पिळवणूक करत असल्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. मात्र, परभणीच्या झिरो फाटा परिसरातील हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमधील घडलेल्या घटनेनं शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.