सीमा आढे, झी मीडिया
Rohit Pawar On Mahayuti: महायुती सरकारमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार टार्गेटवर आहेत का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात मोठा दावा केला आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममध्ये पैशाने भरलेली बॅग दिसणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद कमी करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण तापले आहे. व्हिडीओमध्ये संजय शिरसाट यांच्या खोलीत पैशाने भरलेली बॅग दिसत आहे. काही दिवसांपूर्वी VITS हॉटेल प्रकरणामुळे अडचणीत आलेले मंत्री शिरसाट आता या नव्या व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
मागील काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे गट) नेत्यांचे व्हायरल होणारे व्हिडीओ आणि त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे गटाच्या नेत्यांना अडचणीत आणून आगामी जागावाटपात एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “शिंदे साहेबांच्या नेत्यांचे व्हिडीओ का बाहेर येत आहेत? त्यांच्यावर कारवाई का होत आहे? त्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसा का येत आहेत? भाजपचे आणि अजित पवार गटाचे आमदारही भ्रष्टाचारात कमी नाहीत, पण त्यांना कधी नोटिसा येत नाहीत. फक्त शिंदे गटाच्या आमदारांनाच नोटिसा येतात. यामागे नेमके काय काळे आहे, हे कळत नाही. भाजपकडून एकनाथ शिंदे यांची ताकद कमी केली जात आहे का? आगामी जागावाटपात शिंदे साहेबांना कोपऱ्यात टाकून, ‘आम्ही तुमच्या नोटिसा मागे घेतो, पण तुम्ही कमी जागा घ्या,’ अशी वाटाघाटी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न आता लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.”
मंत्री संजय शिरसाट हे असे व्हिडीओ व्हायरल होणारे पहिले नेते नाहीत. यापूर्वी शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्याही एका प्रकरणात अडचण निर्माण झाली होती. मे महिन्यात विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा धुळे आणि नंदुरबार येथे झाला होता. या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यासाठी पैसे गोळा केल्याचा आरोप झाला होता. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कॅश सापडल्याने खळबळ उडाली होती. माजी आमदार अनिल गोटे यांनी विश्रामगृहातील खोलीत कॅश असल्याचे सांगत त्या खोलीला टाळे ठोकले होते. या प्रकरणाची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली होती.
एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनाच नोटिसा का येतात आणि त्यांच्याच नेत्यांचे व्हिडीओ का व्हायरल होतात, असा प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदे कोणती खेळी खेळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.