एकनाथ शिंदेंनी अमित शहांची गुरू म्हणून पूजा केली, पाय धुतले. त्यांच्या चरणावर डोकं ठेवतानाचा फोटो काढता आला नसला तरी माझ्याकडे संपूर्ण माहिती आहे. यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली, असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले
.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आम्हाला काम करु देत नाही. आम्हाला अडचणीत आणत आहे. आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्या आहेत अशी तक्रार त्यांनी शहांकडे केली. यानंतर शिंदेंनी इतर नेत्यांची भेट घेतली.
शिंदेंनी पुन्हा शहांना ऑफर दिली
संजय राऊत म्हणाले की, यानंतर त्यांनी स्वत:च अशी ऑफर ठेवली की, महाराष्ट्रात मराठी माणसाची एकजूट होत आहे ती तुटली नाही तर आपल्याला फार अवघड जाईल. यावर शहांनी हे थांबवण्यासाठी काय पर्याय आहे विचारल्यावर शिंदेंनी मला मुख्यमंत्री करा मी हे सर्व थांबवतो अशी ऑफर त्यांना दिली. यावर शहांनी सांगितले की मुख्यमंत्री भाजपचाच राहील तर शिंदेंनी मी संपूर्ण गटासह भाजपमध्ये यायला तयार असल्याचे त्यांना सांगितले. यापूर्वीही त्यांनी ही भूमिका मांडली आहे.
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मुख्य नेते हे दिल्लीत किंवा गुजरातमध्ये आहेत. हे मी सत्य बोलत आहे. शिंदे याचा गट या लोकांनी निर्माण केला आहे, त्यांना त्यांचे आदेश पाळावे लागतात. ते काही शिवसेनाप्रमुखांच्या समाधिस्थळी जाऊन कौल लावत नाही. एकनाथ शिंदे गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने दिल्लीत जाणारच होते त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता. मी जेव्हा तुम्हाला माहिती देतो तेव्हा ती माहिती अधिकृत असते.
दिल्ली शिंदेंपेक्षा मला जास्त माहिती
संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसच्या काळातही दिल्लीतून सर्व हालचाली होत होत्या. पण स्वत:ला शिवसेना म्हणून घेणाऱ्यांनी अशी विधाने करणं किंवा दिल्लीच्या राजकारण्यासमोर झुकणं लाजिरवाणे आहे. शिंदेंच्या जवळच्या लोकांवर भविष्यात नक्कीच कारवाया होणार आहेत. त्याप्रकारचे पुरावे केंद्रीय तपास यंत्रणाच्या हाती लागले आहेत. त्यांना वाचवणाऱ्या शक्ती दिल्लीत कमजोर होताना मला दिसत आहे. शिंदे यांच्यापेक्षा मला जास्त दिल्ली माहिती आहे.आयकरची नोटीस मी काही गांभीर्याने घेत नाही, हा केवळ इशारा आहे. यापेक्षा काही वेगळ्या गोष्टी ऑगस्टमध्ये होतील त्यामुळे राज्यात मोठी उलथापालथ होईल.
शिरसाटांचा एक व्हिडिओ आलाय
संजय राऊत म्हणाले की, संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ मला कुणीतरी पाठवला आहे. ज्यामध्ये दिसतंय की मंत्री महोदय बँगा घेऊन बसले आहेत त्यामध्ये पैशाचे बंडल दिसून येत आहे. हे चित्र सर्वत्र जात असतात. सरकारमध्ये आहोत आपल्याला कुणी हात लावणार नाही हा भ्रम जास्त काळ राहत नाही.योग्यवेळी हे पुरावे गोळा होतात आणि कारवाई केली जाते.
95 हजार कोटींची कामे टेंडर शिवाय
संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे-राज ठाकरे राजकीय दृष्टीने एकत्र येऊ नये यासाठी सत्ताधारी खूप प्रयत्न करतील. पण मराठी लोक एकत्र येत आहे. 95 हजार कोटीची कामे टेंडर शिवाय वाटण्यात आली त्यासाठी कंत्राटदारांकडून पैसे घेण्यात आले.हा मुद्दा महाराष्ट्रासह दिल्लीत चर्चीला जातोय. ठेकेदारांना आता हे काम मिळत नसल्याने ते बोलत आहे तर काही ठेकेदार कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.