Maharashtra Rain Alert Today: राज्यातील काही भागांत पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने पुणे घाटमाथा परिसरात अतिवृष्टीसदृश्य पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर ठाणे, नाशिक, पालघर, कोल्हापूर, सातारा आणि कोकणातील जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
‘लोकमत’चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे घाटमाथालगत भागात काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील इतर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ठाणे,नाशिक, कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा
नाशिक घाटमाथा भाग, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या काळात कोकणात ४५-५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.
नंदुरबार, धुळे, जळगाव, आणि विदर्भातील नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई आणि उपनगरामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबई आणि उपनगरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
७ जुलैला पावसाचा जोर कायम राहणार
सोमवारी (७ जुलै) राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुणे घाटमाथा परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय सोमवारी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.