Weather Update: नागपूरसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने मुंबईमध्ये बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र, तितकासा पाऊस झाला नसताना आता आज गुरुवारी पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पाऊस कमी होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
विदर्भात आजही पावसाचा जोर कायम राहाणार आहे. विदर्भातील चंद्रपूर, जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर भागात हलक्या सरींचा अंदाज आहे. दरम्यान उद्यापासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
कोकण तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने कोकणात हाहा:कार माजवला आहे. कोकण तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता आहे. त्यानंतर विदर्भातही पावसाने जोर धरला. अकोला, वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस पडत होता. त्यामुळे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.
पावसाळ्यात अलिबागमध्ये सर्वाधिक तापमान
एकीकडे मुसळधार पाऊस पडत असतानाच अलिबाग येथे बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अलिबागमध्ये 32.1 अंश सेस्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. इतर भागात कमाल तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदवले गेले होते.दरम्यान, संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजाची अचूकता पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी
गेल्या काही वर्षांपासून हवामान विभागाचे अंदाज हा चर्चेचा विषय ठरला आहे. विशेषतः मुंबईसारख्या शहरात, जिथे पावसामुळे वाहतूक, शाळा, कार्यालय यांच्यावर मोठा परिणाम होतो. तिथे हवामान अंदाजाची अचूकता पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी झाल्याचं दिसत आहे. 2020 ते 2024 या चार वर्षांत मुंबईतील मुसळधार पावसाचा फक्त 46 टक्के अंदाज अचूक ठरला आहे. याच माहितीनुसार, 41 टक्के अंदाज पूर्णतः चुकीचे होते. अनेक वेळा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला. तर कधी अंदाज दिलाच गेला नाही. आधुनिक तंत्रज्ञान असूनही अंदाज चुकत असल्याने हवामान खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.