Maharashtra School : पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विदर्भात पावसाने थैमान घातलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमध्ये पावसाने जीनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यात भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. मागील दोन दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. परिणामी, नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यात शाळा, कॉलेजला सुट्टी!
हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विचार महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये तसंच खाजगी कोचिंग क्लासेस यांना गुरुवारी 10 जुलैला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा आदेश फक्त ब्रह्मपुरी तालुक्यातसाठी लागू राहणार आहे. जिल्ह्यातील अन्य तहसिलांतील शाळा आणि शिक्षणसंस्था सुरू राहतील. या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज पार पाडावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
गोसेखुर्द प्रकल्पातून 18000 क्यूमेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विभागात पूर परिस्थितीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुट्टीचा निर्णय घेतला आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून प्राप्त माहितीनुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदीपात्रामध्ये पूरनियंत्रणासाठी 16,500 ते 18,000 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
‘या’ जिल्ह्यातीलही शाळा आणि कॉलेजला सुट्टी!
भंडारा जिल्ह्यात 3 दिवसापासून पावसाची सततधार सुरू आहे. जिल्ह्यात अनेक भागात अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगाने भारतीय हवामान खाते यांनी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तसेच अनेक तालुक्यातील रस्ते मार्ग हे पुराच्या पाण्याने प्रभावित झाले असून जिल्ह्यातील 81 रस्ते हे पुरामुळे वाहतुकीस बंद करण्यात आलेले आहे. भंडारा जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्हयातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालये मधिल विद्यार्थाना गुरुवारी 10 जुलैला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूरस्थिती, एकूण 22 मार्ग बंद झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन दले सज्ज असून जिल्ह्यात 24 तासात 42 मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. तर उत्तर गडचिरोलीत सर्वाधिक पाऊस झाला आहे.