Shahapur School Menstruation Check : राज्यातील शहापूरमधील नावाजलेल्या शाळेमध्ये लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे थेंब आढळल्यामुळे मुलींसोबत घृणास्पद कृत्य करण्यात आले. शाळा प्रशासनाने शाळेतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना बाथरूममध्ये नेत त्यांना अंतरवस्त्र काढून तपासणी करण्यात आली, असा आरोप पालकांनी केला आहे.
शाळेत नेमकं काय घडलं?
झी 24 तासाच्या पत्रकारांनी पालकांशी संवाद साधल्यावर त्यांनी सांगितलं की, शाळेतील बाथरूममध्ये स्वच्छता करणाऱ्या मावशींना रक्ताचे काही थेंब दिसले. त्यात शाळेत पाण्याची कमरता होती. त्यामुळे हा प्रकार झाला असून शकतो, असं पालकांचं म्हणे आहे. पण रक्ताचे थेंब असल्याचे मावशीने शाळेच्या मुख्याध्यापिकांना सांगितलं. त्यांनी मुलींची चौकशी करा असं सांगितलं. त्यामुळे मावशी आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना बाथरूममध्ये घेऊ गेली. त्यानंतर त्यांचे कपडे काढत तपासणी केली. घाबरलेल्या मुलींनी घरी जाऊन सर्व प्रकार पालकांना सांगितला, पालकांनी सांगितलं.
त्यानंतर संतप्त पालकांनी शाळा गाठली आणि शाळेचा प्राचार्यांना जाब विचारला आणि त्यांना राजीनामा देण्याची मागणी केली. यावरून पालक आणि शालेय प्रशानसनमध्ये खूप वादविवाद झाला. त्यानंतर सोमवारपर्यंत मुख्याध्यापिकांवर कारवाई करु असं आश्वासन पालकांना देण्यात आलं. पण मंगळवार उलटून गेल्यानंतरही कारवाई करण्यात आली नाही. म्हणून संतप्त पालकांनी शाळेवर मोर्चा काढला.
मात्र शाळेत शाळा प्रशासनाची अधिकृत व्यक्ती कोणीही नसल्याने पालकांचा आक्रोश वाढला. या बाबत पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी हस्तक्षेप करत शाळेच्या प्राचार्य यांना ताब्यात घेत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले. पालकांचा मोर्चा ही पोलिस ठाण्यात आला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही. तसेच जोपर्यंत शाळेचे विश्वस्त येऊन आमच्याशी संवाद साधत नाही व प्राचार्यांना निलंबित करत नाहीत तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही. असा पवित्र या ठिकाणी पालकांनी घेतलेला आहे. आतापर्यंत पालक पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये ठिय्या मांडून बसले आहेत. पालक ऐकण्याच्या पवित्र्यात नाही आहेत. तसेच जिल्हा परिषद गट शिक्षणाधिकारी रामचंद्र विशेष यांना घेरावा घालत पालकांनी आपण शाळेवर काय कारवाई केली असा जाब विचारला. परंतु गट शिक्षणाधिकारी यांनी कारवाई सुरू असल्याचे सांगितले व शाळा प्रशासन आमचे फोन उचलत नसल्याचे सांगताच पालक संतापले. याचा अर्थ तुमचा शाळा प्रशासनावर अंकुश नाही आहे असा जाब पालकांनी विचारला.
मुख्याध्यापक, दोन विश्वस्त, चार शिक्षक आणि एक शिपाई मावशी अशा आठ जणांवर पोलिसांनी फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यध्यापिका आणि शिपाई मावशी यांना अटक करण्यात आली आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांना निलंबित देखील करण्यात आले आहे. इतर आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे यांनी दिली. पोलिसांनी सदरच्या घटनेची अतिशय चांगल्या प्रकारे दखल घेतल्याने पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.