Sangli Crime News: सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणी या गावामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली असून घटनेनंतर संशयितांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून पीडित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार देखील घडला आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी नराधमांवर कारवाईच्या मागणीसाठी थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवला. तर या घटने प्रकरणी संतप्त करगणी ग्रामस्थांकडून एका संशयित आरोपीला बेदम मारहाण केली आहे. सध्या संशयित आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तसेच या घटनेचा निषेध म्हणून करगणी गाव बंद ठेवण्यात आलं होतं. दरम्यान या घटने प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रमुख संशयीत आरोपी राजू गेंड याला अटक करण्यात आली आहे.
बहिणीसमोरच नराधमाने केला बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीमध्ये शिकणारी मुलगी ही सांगली तालुक्यातील एका गावात कुटुंबासोबत शेतात राहत होती. याच गावात असणाऱ्या शाळेत ती शिक्षण घेत होती. शाळेत जाताना तिला चार तरुण त्रास देत असायचे. ज्यामध्ये राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात आणि अनिल नाना काळे अशी त्या आरोपींची नावे आहेत. रस्त्याने जाताना येताना हे आरोपी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. त्यासोबतच घरच्यांच्या फोनवर फोन करून तिला त्रास देत होते. त्यामुळे ती प्रचंड घाबरली होती.
यामधील राजू गेंड हा तिच्यावर दबाव टाकून शरीर सुखाची मागणी करत होता. परंतु, तिने त्याची मागणी अनेकदा धुडकावून लावली. त्यानंतर राजू गेंड याने जबरदस्तीने तिला गावातील एका खोलीवर नेत बलात्कार केला होता. ही सर्व अत्याचाराची घटना तिच्या बहिणीच्या समोरच झाली होती. तसेच या घटनेचा व्हिडिओही बनवला होता. व्हिडीओचा धाक दाखवून तो तिला त्रास देयचा. या सर्व प्रकारामुळे ती तणावाखाली वावरत होती. या तरूणांचा त्रास वाढत चालल्याने रविवारी तिने पालकांना हा सर्व प्रकार सांगितला.
पोलिसांकडून आरोपींचा तपास सुरु
तिने सर्व घटना सांगितल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं ठरवलं. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या सर्व प्रकरणाचा स्थानिक पोलीस निरीक्षक विनय बहिर आणि पोलिसांनी पंचनामा केला असून याप्रकरणी राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात आणि अनिल नाना काळे यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत.