पुणे शहरातील उच्चभ्रू वस्तीत समजल्या जाणाऱ्या बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. परिमंडळ ४ अंतर्गत करण्यात आलेल्या या धडक कारवाईत एकूण १८ तरुणींची सुटका करण्यात आली असून
.
विमानतळ परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये मंगळवारी (दि. ८) छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी येथून १६ तरुणींची सुटका केली. यामध्ये १० परदेशी नागरिक, ४ महिला आणि २ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. स्पा सेंटरचा मालक, व्यवस्थापक आणि जागेचा मालक यांच्याविरोधात पीटा आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून पीडित महिलांना मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात होते. काही तरुणींना मोबदल्याचे आमिष दाखवण्यात आले होते. विमानतळ पोलिस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांची बनावट ग्राहक पाठवून कारवाई
दुसऱ्या घटनेत बाणेर परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून २ तरुणींची सुटका केली आहे. येथेही स्पा व्यवस्थापक आणि मालकावर पीटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी मसाज सेंटरच्या आडून देह व्यवसाय चालवण्यात येत होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून ही माहिती पडताळून कारवाई केली. एकाच दिवशी या दोन्ही कारवायांमुळे स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गोविंद जाधव, चंद्रशेखर सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दोन अल्पवयीन मुलींसह पाच तरुणींची सुटका
मसाजच्या नावाखाली धानोरी भागातील पोरवाल रोड परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा पर्दाफाश करत, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पाच पीडित तरुणींची सुटका केली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ७) दुपारी करण्यात आली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात स्पा सेंटर मॅनेजर महिला किरण बाबुराव आडे उर्फ अनुराधा बाबुराव आडे (वय २८, रा. राघे निवास, लेन क्र. ६, खराडी) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या भागात मोठी कारवाई झाली आहे.