Maharashtra Politics : ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर महायुती अलर्ट झाली असून ठाकरेंना शह देण्यासाठी मिशन पालिका सुरू केल्याची माहिती आहे. विविध समुदायाच्या लोकसंख्येनुसार पालिका निवडणुकांचा फार्म्युला ठरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु झाली आहे.
महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन महिन्यात पालिका निवडणुकींचं बिगुल वाजणा आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू आहे. मराठीच्या मुद्द्यावरून एकीकडे 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत. पालिका निवडणुकीत देखील ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुती देखील अलर्ट मोडवर आली. ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीकडून मिशन महापौरची घोषणा करण्यात आलीय, मुंबईतील विविध समुदायाची टक्केवारीनुसार महायुतीच्या निवडणुकीचा फॉर्म्युला ठरणार असल्याची शक्यता आहे.
महायुतीचा कोणता फॉर्म्युला?
सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई पालिका निवडणुकीत मराठी- अमराठी असं ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यापासून महायुती उमेदवारांसाठी सर्व्हे करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडे अमराठी मतांची जबाबदारी असल्याची माहिती आहे. दादांच्या राष्ट्रवादीकडे बहुजन मतांची जबाबदारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदेंच्या शिवसेनेकडे मराठी मतं वळवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत राज्य सरकारला काही सवाल केले आहेत. त्यामुळे मराठी आणि अमराठी असा मुद्दा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापण्याची शक्यता आहे. मात्र, याच मुद्द्यावरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंतांनी भाजपर निशाणा साधलाय. भाजपला राज्यात हिंदी-मराठीचं नरेटिव्ह सेट करायचाय असा आरोप सावंत यांनी केला. मुंबईत मराठी माणसांची संख्या कमी झाली. तर, अमराठी माणसांची संख्या मागील काही दिवसात वाढलीय. त्यामुळे भाषेच्या मुद्द्यावरच पालिका निवडणुका लढवल्या जाणार असल्याची शक्यता आहे.
मुंबईत कोण किती टक्के?
मुंबईत 32 टक्के मराठी माणसं आहेत. 14 टक्के मुस्लिमांची लोकसंख्या आहे. इतर अमराठींची संख्या ही 54 टक्के आहे. मागील अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा होता. दरम्यान शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवरची सत्ता भाजपला उलथवून लावायची आहे. त्यामुळे महायुतीकडून मुंबई पालिकेसाठी मिशन महापौर राबवण्यात येतंय. त्यामुळे महायुतीचा या मिशनचा किती फायदा होणार? हे पालिका निवडणुकीनंतरच समोर येणार आहे.