Monsoon Trekking in Maharashtra : महाराष्ट्र आणि इथला पाऊस… एक वेगळंच नातं. मुळात या रांगड्या महाराष्ट्राच्या अंगाखांद्यांवरून जेव्हा पाऊसधारा कोसळात तेव्हा त्याचं रुपडंच पालटून जातं. विदर्भापासून ते अगदी सह्याद्रीपर्यंत पावसादरम्यानचा महाराष्ट्र पाहण्याची मजाच काही और. अशा या महाराष्ट्रात गडकोट आणि डोंगरमाथे सर करणाऱ्यांचा आकडा मागील काही वर्षांमध्ये वाढला असून, दरवर्षी काही गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगवेड्या मंडळींची गर्दीच होते.
यंदाही हे चित्र हरिहर, हरिश्चंद्रगड इथं पाहायला मिळालं. त्यामुळं निसर्गाची शांतता अनुभवण्याची खरंच इच्छा असणाऱ्या अनेकांचाच हिरमोड झाला. पण, तसं होऊ देऊ नका. कारण, ट्रेकिंगची एक नवी वाट या मंडळींसाठी उपलब्ध असून, सह्याद्रीच्याच एका सुरेख अशा वाटेवरून या ट्रेकला जाता येऊ शकतं.
गर्द रानावनात दडलेला हा ट्रेक म्हणजे आद्राई. (Aadrai Jungle Trek) सतत कोसळणाऱ्या पावसामुळं शक्य तिथं फक्त आणि फक्त हिरवळ असणाऱ्या या आद्राई जंगल ट्रेकमध्ये मधूनच डोकावणारी सूर्यकिरणं हिरवाईला अशीकाही लकाकी देऊन जातात की आपण एका वेगळ्याच विश्वात आल्याची अनुभूती इथं जाणवते. पुण्याच्या जुन्नर भागामध्ये येणारं हे आद्राईचं जंगल शहरी गजबजाटापासून दूर जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी पर्वणी.
मुख्य आकर्षण…
रानावनातून वाट काढत पुढे जाणाऱ्या या ट्रेक/ ट्रेलमध्ये वनस्पतींच्या बहुविध प्रजातींची झलक पाहायला मिळते. इतकंच नव्हे, तर या ट्रेकच्या वाटेत काही लहानमोठे धबधबेसुद्धा येणाऱ्यांच्या प्रतीक्षेत असतात. मुख्य आकर्षण ठरतो तो म्हणजे या ट्रेकदरम्यानचा तब्बल 1200 फूट उंचीचा अजस्त्र असा काळू धबधब्याचा व्ह्यू पॉईंट.
हेसुद्धा पाहा : Highest Railway Station: बापरे! कोण करतं अशा भयानक रेल्वे स्थानकावरून प्रवास? म्हणाल ट्रेन रुळावर नव्हे हवेतच उडते….
निसर्गाची ही लीला पाहताना आद्राई ट्रेक नेमका का कमाल आहे याची खात्रीच पटते. फक्त रानावनातून जाणारी सुरेख वाटच नव्हे तर, काळू धबधबा, नागेश्वर मंदिर, अनेक गुहा या ट्रेकमध्ये येणाऱ्यांना थक्क करून जातात. माळशेज घाटापासून जवळच असणाऱ्या या ट्रेकला यंदाच्या मान्सूनमध्ये अनेकांनीच पसंती दिली असून, सध्या सोशल मीडियावरही त्याचे अनेक Reels व्हायरल होत आहेत. पण, गर्दीनं ही वाटही भरण्याआधी तुम्ही कधी जाताय आद्राईला?