संगीत क्षेत्रातील लोकप्रिय कलावंत श्रीपाद सोलापूरकर, सुशील शिरसाट आणि ईक्बाल दरबार आठवणींच्या रूपांने आपल्यातच आहेत. या कलाकारांचे सांगीतिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. सातत्य, साधना ही परंपरा लाभलेल्या या गायक-वादकांनी कलाकराला सन
.
पुण्यातील प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक श्रीपाद सोलापूरकर, सुशील शिरसाट आणि ईक्बाल दरबार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आणि श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टतर्फे सोमवारी (दि. 7) श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. पूना गेस्ट हाऊस येथे आयोजित श्रद्धांजली सभेत सुहृद आणि संगीत क्षेत्रातील कलाकारांनी शब्दसुमनांजली अर्पण केली. पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी कार्यक्रमाविषयी प्रास्ताविकात माहिती दिली.
ईक्बाल दरबार यांच्याविषयी बोलताना मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्राचे संस्थापक अशोककुमार सराफ म्हणाले, ईक्बाल हे उत्तम गायक व वादक होते. त्यांना परिपूर्णतेचा ध्यास होता. माणूस म्हणूनही ते दिलदार, उदार व्यक्तीमत्त्व होते.
भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई म्हणाले, हे तीनही कलाकार भूलोकीचे गंधर्वच होते. त्यांनी सामाजिक क्षेत्रातही मोलाचे कार्य केले. पुण्यातील कसबा गणपती व जोगेश्वरी या मानाच्या गणपतींच्या पालखीची धुरा वाहण्याची संधी ईक्बाल दरबार यांच्या पुढाकारातून जाती-धर्म-पंथ विसरून अनेकांना मिळत आहे.
सुहासचंद्र कुलकर्णी, म्हणाले, प्रसिद्धीसाठी न आसूसता मेहनती आणि हरहुन्नरी कलाकार म्हणून ईक्बाल दरबार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ऑर्केस्ट्रा क्षेत्रात हुकमी एक्का म्हणून त्यांची ओळख होती. माणूस आणि कलाकर म्हणून ते अतिशय प्रगल्भ होते आणि आत्मविश्वासाने मार्गक्रमण करीत होते.
ऑल आर्टिस्ट फौंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर म्हणाले, हे तीनही कलाकार उत्तम मार्गदर्शक होते. आपल्या जवळील संगीत क्षेत्राचे ज्ञान त्यांनी इतर कलाकारांना भरभरून दिले. आम्हा सर्व कलाकारांसाठी ते जिंदादिल मित्रच होते.
रमेश सोलापूरकर यांनी सॅक्सोफोनवर गीत सादर करून सांगीतिक श्रद्धांजली वाहिली. जितेंद्र भुरूक, संदिप पंचवाटकर, श्रीधर कुलकर्णी, वसंत बल्लेवार, उल्हास पवार, मोहन कुमार भंडारी, श्रीधर कुलकर्णी, विवेक परांजपे, अनिल गोडे, जयंत जोशी, आनंद सराफ, प्रकाश भोंडे, आरती दीक्षित, विजय केळकर यांनी श्रीपाद सोलापूरकर, सुशील शिरसाट आणि ईक्बाल दरबार यांच्याविषयी आठवणी जागविल्या. रत्ना दहिवलेकर यांनी कलाकरांविषयी आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.