Eknath Shinde On Raj Thackeray : 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे पर्वाला सुरूवात झाली आहे. 5 जुलै 2025 रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. मराठीच्या मुद्यावर दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेत. मात्र, भाजपसह शिंदेच्या शिवसनेचे नेते ठाकरेंवर टीका करत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारांनी ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर टीका केलीय. एकाचं भाषण अपूर्ण होतं, तर दुस-याचं भाषण अप्रासंगिक होतं. असा टोला शेलारांनी ठाकरे बंधूंना लगावला. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. संपूर्ण भारतात शेलार एक नंबरचे वक्ते असल्याचा टोला त्यांनी लगावला. शिंदेच्या शिवसेनेचे नेतेही ठाकरेंवर टीका करत आहेत. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात न बोलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या पक्षातील प्रवक्तांना आणि नेत्यांना दिले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजय मेळाव्यानंतर राज ठाकरे यांच्या विरोधात आणि मेळाव्या विरोधात कोणत्याही प्रकारची टीका न करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत.
राज ठाकरे यांच्यावर किंवा यांच्या विरोधात बोलण्याचा विषय काय येतो. ना कुठला पक्ष, ना कुठला झेंडा अशी त्यांची भूमिका राज ठाकरे यांची होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती, मराठी भाषा सोडून खालच्या पातळीची टीका त्या मेळाव्यात केली. मुंबई महापालिका निवडणूक, आणि पालिकेची तिजोरी डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी भाषण केल. उद्धव ठाकरे हे हारलेले दिसून आले. राज ठाकरे आमच्याबद्दल काही बोलले नाहीत म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही असं शिवसेना खासदार नरेश मस्के म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्ही सतत बोलू. उद्धव ठाकरे यांनी अतिशय गलिच्छ पद्धतीने भाषण करुन उसण अवसान आणलं,अश्लील भाषण करण्याचा प्रयत्न केला. पालिका निवडणुका तिजोरी डोळ्यासमोर ठेऊन भाषण केले. महाराष्ट्र, मराठी माणसांवर अन्याय असं भडकावून निवडणुका लढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मराठी माणसांना भडकावून त्यांची मत मिळवणे हाच त्यांचा उद्देश होता असी टीका नरेश मस्के यांनी केली.