Nagpur Crime News: प्रियकराच्या सहाय्याने बायकोने पतीलाच निर्घृणपणे संपवल्याची घटना नागपूरात घडली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने पतीला संपवल्याच्या या प्रकारने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. इतकंच नव्हे तर पत्नीने पतीच्या हत्येला नैसर्गिक मृत्यूचे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर पत्नीचे बिंग फुटले आणि ही हत्या असल्याचेच समोर आले. 38 वर्षीय चंद्रसेन रामटेके असं मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिशा रामटेके असं पत्नीचे नाव असून तिचे चंद्रसेन यांच्याशी तेरा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हा पासून तो घरीच होता. त्यामुळं दिशा घरखर्च भागवण्यासाठी पाण्याचे कॅन भरून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय करत होती.
काही महिन्यांपूर्वी दिशाचे आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला या दुचाकी दुरुस्ती आणि पंक्चरचे काम करणाऱ्या व्यक्तीशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र त्यांच्या प्रेमात चंद्रसेन हा अडसर ठरत होता. त्यांच्या प्रेमसंबंधांची कुणकुण त्याला लागली होती.
4 जुलै रोजी दिशाचे पती चंद्रसेन हे घरात निपचित पडलेले दिसले. तेव्हा त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोस्टमार्टम अहवालानुसार, गळा, नाक आणि तोंड दाबल्यामुळं मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यामुळं तपासाची दिशाच बदलली. पोलिसांनी शासकीय रुग्णालयाच्या पोस्टमार्टम कक्षाजवळ दिशाला बोलून तिची चौकशी केली तेव्हा तिने हत्येची कबुली दिली आहे.
दिशा आणि आसिफ इस्लाम अन्सारी यांच्या अनैतिक संबंधांची माहिती चंद्रसेन यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळं त्याला संपवण्याचा प्लान आखण्यात आल्याचे तपासात समोर आले. दोघांनी चंद्रसेन याचा गळा आवळला आणि नाक तोंडावर उशी दाबून धरली. त्यामुळं श्वास गुदमरून तडफडून चंद्रसेन याचा मृत्यू झाल्याचं तपासात समोर आलं आहे.