Education News : राज्यात त्रिभाषा सूत्रावरून रणकंदन माजलेलं असताना दुसरीकडे शाळांची दूरवस्था हा मुद्दासुद्धा आता चर्चेचा विषय ठरला असून, सद्यस्थिती पाहता शालेय शिक्षणाच्या मुद्द्याकडे प्रशासनाचं सपशेल दुर्लक्ष झाल्याचं दृश्य पाहता लक्षात सयेत आहे. झी 24तासनं हीच वस्तूस्थिती दाखवत काही शाळांचा आढावा घेतला असता गंभीर स्थिती पाहायला मिळाली.
पालघरमध्ये विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील घाणेघर इथे जवळपास दीडशे विद्यार्थी रोज शिक्षणासाठी धोकादायक प्रवास करतात. लाकडी साकावावरून हे विद्यार्थी शाळेसाठी रोज जीवघेणा प्रवास करतात. या ठिकाणी नाल्यावर पूल बांधण्याची गावकऱ्यांची दहा वर्षापासून मागणी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. गावात एसटी बस येत नसल्याने आणि इतर प्रवासाची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आड मार्गाने पावसाळ्यात दररोज पायी घाणेघर ते भोपोली सात ते आठ किलोमीटर अंतर असल्यामुळे मुलं या शॉर्टकटचा वापर करताना दिसत आहेत.
मुंबईतील घाटकोपरचंही उदाहरण घ्याच…
मुंबई महापालिकेच्या घाटकोपर येथील टिळक मार्ग शाळेत विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन केलं आहे. या शाळेची इमारत मोडकळीला आली असून, जुन्या जागेत अतिशय धोकादायक ठिकाणी साडे तीनशे विद्यार्थी शिकत आहेत. मात्र अचानक पालिका प्रशासनांने सदर जागा धोकादायक आहे सर्व विद्यार्थ्यांना दीड ते दोन किमी लांब शाळेत स्थलांतरित करणार असल्याचे पालकांना सांगितलं. या शाळेच्या बाजूलाच शाळेची नवी इमारत बांधून तयार आहे, मात्र तरिही मुलांना दुसऱ्या शाळेत पाठवण्याचा घाट कशाला असा सवाल विचारत पालकांनी बेंच घेऊन नव्या इमारतीमध्ये प्रवेश केला.
साताऱ्यात व्हरांड्यात बसून शिक्षण
साताऱ्यातील जावली तालुक्यातील सायळी गावात शाळेच्या गळक्या इमारतीमुळे व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावं लागत असल्याचं समोर आलं आहे. वर्गात सगळीकडे पाणीचपाणी झालंय. शाळेची इमारत एवढी जीर्ण झालीय की भिंतीना तडे गेलेत.इमारतीचे कॉलम तुटलेत त्यातून लोखंडी बार बाहेर आलेले दिसतायत.शाळेच्या शिक्षकांकडून या बाबत पाठपुरावा करून देखील बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद याकडे दुर्लक्ष करतंय. शाळेत चार विद्यार्थी असले तरीही विद्यार्थ्यांचा जीव गेल्यानवर प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय.
हेसुद्धा वाचा : हिंदी सक्तीचं राहुद्या; आधी हे बघा! राज्यातील 8000 गावं शाळांविनाच
विद्यार्थ्यांना वाली कोण?
चंद्रपुरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय. या विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील सोनपूर गावातील जिल्हा परिषद शाळेला शासकीय अनास्थेचा फटका बसला आहे. 2 महिन्यांपूर्वी वादळी वा-यामुळे या शाळेचं छप्पर उडालं. त्यानंतर शाळेच्या दुरुस्तीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पत्र पाठवण्यात आलं. मात्र शाळा सुरु झाली तरी शाळेची दुरुस्ती झाली नाहीये. अखेर या शाळेतील विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली. ऐन पावसाळ्यात शिक्षकांना आणि मुलांना जीव मुठीत घेऊन उघड्यावरच अभ्यास करावा लागतोय. त्यामुळे आता तरी प्रशासनाने शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शाळा कधी मिळणार असा सवाल झी २४ तास विचारतंय.