Beed News : बीडमधून रविवारी सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली असताना पुन्हा एकदा सावकारी जाचाला कंटाळून एका कापड व्यावसायिकाने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. ‘वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड…’ अशी धमकी सावकाराने मयत व्यक्तीला दिली. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी कापड व्यावसायिकाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असणारे राम फटाले यांनी सात वर्षांपूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. याची परतफेड देखील 25 हजार रुपये प्रति महिना प्रमाणे करण्यात आली. मात्र पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता. ‘तुझ्याकडून वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड… ‘ असे म्हणत सावकाराने कापड व्यावसायिकाचा मानसिक छळ केला. वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राम फटाले यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली.
दरम्यान या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात सावकार डॉ. लक्ष्मण जाधव आणि त्याच्या पत्नीसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल असून तिघेजण अटकेत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक रवाना केले आहे. यातील मुख्य संशयित आरोपी डॉ.लक्ष्मण जाधव हा भाजपाचा पदाधिकारी आहे.
हेही वाचा : हिंदी सक्तीचं राहुद्या; आधी हे बघा! राज्यातील 8000 गावं शाळांविनाच
जिल्ह्यात महिनाभरापूर्वीच सावकारी जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केली होती. ही प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एकाने आत्महत्या केल्याने सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
रविवारी शेतकऱ्याने केली आत्महत्या :
बीड परिसरातील नवगण राजुरी येथील शेती आणि ऊसतोडणीवर गुजराण करणाऱ्या शेतकरी गंगाराम विश्वनाथ गावडे यांनी सुद्धा सावकारी जाचाला कंटाळून रविवारी आत्महत्या केली. दोन वर्षापूर्वी अडचणीसाठी गावातीलच लाला ऊर्फ युवराज बहीर याच्याकडून दोन हजार रुपये दहा टक्के प्रतिमहिना व्याजावर घेतले होते. या रकमेची परतफेड करूनही सावकाराने दोन हजारांची रक्कम दोन वर्षातच व्याजासकट 28 हजार केली. तसेच हे पैसे देण्यासाठी शेतकऱ्याकडे तगादा लावला. सावकाराकडून शेतकऱ्याला मारहाणीच्या धमक्या मिळू लागल्या ज्यामुळे शेतकरी मोठ्या तणावाखाली होता. तसेच सावकाराने गंगारामला मारहाण देखील केली. अखेर तणावाखाली आलेल्या शेतकऱ्याने रविवारी पहाटे 3 वाजता चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.