महाराष्ट्रात सध्या अनेक भागांमध्ये पावसाने चांगलाच जोर धरला आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये संततधारा सुरू असल्याने नोकरदार वर्गाला चांगलाच फटका बसत आहे. अनेक
.
पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टी
पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील अंगणवाड्या, सरकारी आणि खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका शाळा, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रम शाळा, सर्व महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आज (07.07.2025) सुट्टी जाहीर केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कामासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच, जिल्हा उपमहापौर डॉ. इंदू राणी जाखड यांनी आदेश दिले की, या काळात सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावे.
नाशिक जिल्ह्यात देखील सततच्या पावसाने नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमधील रामकुंडातही पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुणेगाव धरण देखील 75 टक्के भरले असून त्यातून उनंद नदीत 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे वणी आणि चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने आज भंडारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज हवामान विभागाने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येथील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरी, रायगड, भंडारा, गोंदिया, नाशिक आणि सातारा येथील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
रेल्वे वाहतूक विस्कळीत
राज्यातील अनेक भागांतील संततधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईतील लोकल गाड्या सध्या उशिराने धावत असून, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः कोकण रेल्वे मार्ग तसेच घाटमाथ्यावरील मार्गांवरील गाड्यांवर उशिराचा परिणाम झाला आहे.