Uddhav Thackeray Shivsena Slams CM Devendra Fadnavis: ‘देवेंद्रांची रुदाली’ असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘सामना’च्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे. “हिंदी सक्तीचा वरवंटा सरकारच्याच डोक्यात हाणून महाराष्ट्रात मराठी एकजुटीचा आवाज गगनापर्यंत घुमला आहे. यानिमित्ताने ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले आणि मराठी जनांचा अवघा रंग एक झाला याचे दुःख महाराष्ट्राच्या शत्रूंना वाटणे साहजिकच आहे. वरळीच्या ‘डोम’ सभागृहात आणि बाहेर मराठी एकजुटीचे विराट दर्शन भारताने पाहिले. हा सोहळा शिवतीर्थावर झाला असता तर तेही मराठी उत्साहापुढे तोकडेच पडले असते, पण काही कपाळ करंट्यांना मराठीचा हा जल्लोष सहन झाला नाही. काहींना ठसके लागले, काहींना मळमळले, काहींना जळजळले. काही जण भांग मारल्याप्रमाणे बडबडू लागले. काही जण झोपले ते अद्यापि उठले नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांना हे सर्व विकार एकाच वेळी झाले व त्यात मराठी एकजुटीच्या द्वेषाची कावीळ झाली,” असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
यासारखी राज्याची शोकांतिका नाही
“‘ठाकरे’ नेतृत्वाखाली जमलेल्या मराठी मेळ्यास फडणवीस ‘रुदाली’ असे म्हणतात. त्यांनी हे भाष्य माऊलींच्या पंढरपुरात केले. मेळाव्यात मराठीचा विजयोत्सव नव्हता तर ‘रुदाली’ होती, असे ते म्हणाले. ज्यांना मराठी जनांच्या विजय गर्जना हे ‘रुदाली’ म्हणजे रडगाणे वाटते अशा विचाराचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या गादीवर बसले आहेत. ‘रुदाली’ हा शब्द मूळ मराठी भाषेतला नाही. हा शब्द त्यांनी हिंदी शब्दकोशातून उसना घेतला. राजस्थान, हरयाणा, बुंदेलखंड, मध्य प्रदेश वगैरे भागांत ‘रुदाली’ हा प्रकार आहे. एखाद्याच्या घरी मृत्यू वगैरे काही दुःखद प्रसंग घडला असेल तर तेथे भाड्याने म्हणजे पैसे मोजून रडण्यासाठी, छाती पिटून आक्रोश करण्यासाठी (श्रीमंतांच्या घरी) बायका बोलावल्या जातात. रोख पैसा घेऊन त्या रडतात व निघून जातात. फडणवीस यांनी ‘मराठी’ विजयाचा जल्लोष करणाऱ्या मराठी अस्मितेला मृत्यूसमयी पैसे घेऊन रडणाऱ्या बायकांची उपमा द्यावी यासारखी राज्याची शोकांतिका नाही,” असा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
फडणवीसांना ही ‘रुदाली’ वाटणे साहजिक
“हिंदी सक्तीविरोधात मराठी माणूस एकवटला व त्याचे नेतृत्व ठाकरे बंधूंनी केले याचा आनंद तमाम महाराष्ट्राला झाला, पण मराठी विजयावर ‘रुदाली’च्या गुळण्या टाकण्याचे काम श्री. फडणवीस यांनी केले ही त्यांची निराशा आणि वैफल्यावस्था आहे. याचा अर्थ मराठी एकजूट फडणवीस यांना मान्य नाही व मराठी एकजुटीमुळे त्यांना हिंदी सक्तीचा कायदा रद्द करावा लागला याची खदखद मनात आहे. त्यामुळे मराठी विजय त्यांना ‘रुदाली’ वाटणे साहजिक आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
छत्रपती शिवरायांच्या मराठी भाषेला ‘रुदाली’ म्हणणे म्हणजे…
“फडणवीस व त्यांच्या पक्षाकडे प्रचंड धनसंपत्ती आहे. हा लुटीचा माल आहे. त्यामुळे रडण्यासाठी, हसण्यासाठी, मोदी वगैरेंच्या सभेला टाळ्या वाजविण्यासाठी भाड्याने माणसे आणणे त्यांना परवडू शकते. अस्सल स्वाभिमानी मराठी माणूस या स्वाभिमान विक्रीच्या भानगडीत पडत नाही. तो मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी इतिहास व त्यातील मर्दानी बाण्यावर मनापासून प्रेम करतो. ‘रुदाली’ ही काही महाराष्ट्राची परंपरा नाही व मराठी भाषेची संस्कृतीदेखील नाही. छत्रपती शिवरायांच्या मराठी भाषेला ‘रुदाली’ म्हणणे म्हणजे हुतात्मा चौकासमोर उभे राहून ‘जय गुजरात’च्या घोषणा देण्यासारखेच आहे. अशा घोषणा देणारे लोक फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत व फडणवीस ‘जय गुजरात’ म्हणणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत. संयुक्त महाराष्ट्र लढ्याची ‘रणगर्जना’ होती, फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे ‘रुदाली’ नव्हती,” असं लेखात म्हटलं आहे.