Nirahua On Marathi Langauge : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हिंदी विरोधी अनेक गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही भाऊ मराठी भाषेसाठी एकत्र आले. महाराष्ट्रात असताना तिसरी भाषा म्हणून हिंदी का शिकावी, हिंदी भाषिक राज्यांमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवतात असा सवाल देखील त्यांनी केला. तर या सगळ्यात आता अभिनेते आणि भाजप खासदार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ हे त्यांचा आगामी चित्रपट ‘हमार नाम बा कन्हैया’ च्या प्रमोशनमध्ये या भाषेच्या वादावर बोलत आपला देश हा वेगवेगळ्या भाषा आणि सगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. तर निरहुआ म्हणाले की असं घाणेरडं राजकारण करू नका.
निरहुआ पुढे म्हणाले, कोणात इतकी हिंम्मत असेल तर आम्हाला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, मी मराठी बोलत नाही. मी सगळ्या राजकारण्यांना आव्हान देतो की मला महाराष्ट्रा बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. मी इथेच राहतो. मला हकलवून लावण्याचा प्रयत्न करा.
मराठी एक सुंदर भाषा आहे असं म्हणत निरहुआ यांनी पुढे सांगितलं की सगळ्यांना जितक्या जमतील तितक्या भाषा सगळ्यांनी शिकायला हव्या. पण कोणतीही भाषा शिकण्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती करू नये. याविषयी सांगत ते पुढे म्हणाले ‘मी एक राजकारणीही आहे आणि माझं असं ठाम मत आहे की, राजकारण हे लोकांच्या कल्याणासाठी असावं, त्यांच्या शोषणासाठी नव्हे. जर कोणी पाच वेगवेगळ्या भाषा शिकू इच्छित असेल, तर त्याने नक्कीच शिकाव्यात.’
मराठी ही सुंदर भाषा आहे, पण…
त्यांनी पुढे सांगितलं की ‘मराठी अतिशय सुंदर भाषा आहे, तशीच भोजपुरी, तमिळ, तेलुगू, गुजराती आणि भारतातल्या अनेक भाषा सुंदर आहेत. कोणी एखादी किंवा पाच भाषा शिकू इच्छित असेल, तर त्यानं नक्की शिकाव्या. पण जर ती व्यक्ती शिकू शकत नसेल तर कोणालाही जबरदस्ती करू नये. भाषा शिकवण्याच्या नावाखाली कोणाचंही शोषण होऊ नये.’
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी मीरा रोडमधील एका रेस्टॉरन्ट मालकावर केवळ त्याने मराठीत बोललं नाही म्हणून कानशिलात लगावली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या.