भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील चुल्हाड शेतशिवारात सोशल मीडियासाठी रील तयार करताना एक 17 वर्षीय तरुणाचा खोल खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी घडली. तीर्थराज बारसागडे (रा. सोनेगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याला
.
मिळालेल्या माहितीनुसार, तीर्थराज आणि त्याचे काही मित्र चुल्हाड परिसरातील एका शेतशिवारात गेले होते. तिथे पाण्याने भरलेल्या एका मोठ्या खड्ड्यात पोहण्याचा स्टंट करताना रील चित्रीत करण्याचा त्याचा विचार होता. त्यासाठी त्याने स्वतःचा मोबाईल मित्रांच्या हातात दिला आणि खड्ड्याच्या दुसऱ्या टोकावरून पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याची खोली लक्षात न आल्याने तो पाण्यात बुडू लागला.
मदतीसाठी आकांत पण…
या घटनेदरम्यान तीर्थराज जिवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडत होता, हातपाय हलवत होता, पण हे सगळं पाहूनही त्याचे मित्र ते रीलचाच भाग असावा असे समजून चित्रीकरण करतच राहिले. तेव्हा त्याच्यावर कोणीही धावून न गेल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिस घटनास्थळी पोहोचले. तीर्थराजचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. यासंदर्भात खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद अड्याळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांकडून आता या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे.
प्रसिद्धीपेक्षा जीवन अधिक मौल्यवान
दरम्यान, भंडाऱ्यात घडलेली घटना सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणाईच्या धोकादायक सवयीकडे लक्ष वेधणारी आहे. थोड्याशा प्रसिद्धीसाठी जीवाशी खेळण्याचा प्रकार किती महागात पडतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे. तीर्थराजचा दुर्दैवी मृत्यू ही सोशल मीडियाच्या अतिरेकाची जिवंत आणि हृदयद्रावक उदाहरण ठरली आहे. यामुळे पालकांनी आणि समाजाने तरुणांच्या ऑनलाइन वर्तनावर लक्ष ठेवण्याची आणि त्यांच्या सुरक्षिततेविषयी जागरूकता वाढवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. प्रसिद्धीपेक्षा जीवन अधिक मौल्यवान आहे, हे समजावणे आवश्यक आहे.