Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance : महाराष्ट्राचं अख्खं राजकारण ज्या नावाभोवती घोंगावतं ते नाव म्हणजे ठाकरे. तेच ठाकरे बंधू आता 2 दशकानंतर एकाच फ्रेममध्ये दिसले आणि महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे पर्वाला सुरूवात झाली. राज ठाकरेंनी मनसेची स्थापन केल्यानंतर दोन्ही भाऊ वेगळेझाले होते. मात्र, 20 वर्षानंतर दोन्ही भाऊ आता एक झाले असून भविष्यातही सोबतच प्रवास करणार आहेत. हिंदीचा जीआर रद्द केल्यानंतर ठाकरेंनी बंधूंनी विजयी मेळाव्याची घोषणा केली. त्यानंतर आज महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशानं ठाकरे बंधूंच शक्तिप्रदर्शन बघितलं. महाराष्ट्राचे राजकारण बदलवणाऱ्या विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे.
विजयी मेळाव्यानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहासाचे वातावरण आहे. राज ठाकरे यांनी प्रवक्ते आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. मुख्य माध्यम तसेच सोशल माध्यमांमध्ये व्यक्त होण्यापूर्वी बोलण्यापूर्वी राज ठाकरे यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. मनसे पदाधिकारी प्रवक्त्यांना राजकीय प्रतिक्रिया मत, प्रदर्शन करताना राज ठाकरेंची परवानगी घ्यावी लागणार आहे. विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरे यांच्या प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
विजयी मेळाव्यात दोन्ही भावांची देहबोलीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. 20 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांची देहबोली कशी असेल याची उत्सुकता होती. ही उत्सुकता फक्त राजकीय अभ्यासकांना नव्हती. तर ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी आशा लावून बसलेल्या सामान्य शिवसैनिक आणि मनसैनिकांची होती. विजयी मेळाव्यासाठी जेव्हा उद्धव ठाकरे वरळीत पोहचले तेव्हाच त्यांच्या चेह-यावर हास्य होतं. कोणताही तणाव त्यांच्यात नव्हता. त्यांचं स्वागत बाळा नांदगावकरांनी केलं तेव्हा त्यांचा चेहरा त्यांच्या मनातला आनंद सांगत होता. राज आणि उद्धव ठाकरे स्टेजवर येण्याआधी जेव्हा स्टेजच्या दोन्ही बाजुला उभे होते तेव्हा दोघांच्या चेह-यावर बंधूभेटीचा आनंद होता. जेव्हा दोन्ही भाऊ स्टेजवर आले त्याक्षणी एकच जल्लोष झाला. त्यावेळी दोन्ही भावांनी एकमेकांना अलिंगण देऊन उपस्थितीतांना अभिवादन केलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जरी भाऊ असले तरी दोघांनीही एकमेकांचा उल्लेख सन्माननीय असं विशेषण लावलं.