अनिरुद्ध दवाळे, झी मराठी, अमरावती : अमरावतीच्या मेळघाटातील दहेंद्री गावात एक एक धक्कादायक व संताप जनक प्रकार घडला आहे. पोटफुगीच्या विकार झालेल्या 10 दिवसांच्या बाळावर वृद्ध महिलेने अघाेरी उपचार केले. गरम विळ्याने त्याच्या पोटावर 39 चटके दिले. हा प्रकार घटनेनंतर 7 दिवसांनी समोर आला. रिचमू धोंडू सेलूकर असे या बाळाच्या आईचे नाव असून तिनेच पोलिसांत तक्रार दिली आहे. रिचमू हिने 15 जून रोजी मुलीला जन्म दिला. तिची प्रकृतीही उत्तम होती. पण दहा दिवसांनी मुलीला सर्दी झाली. तिचे पोटही फुगले. त्या वेळी नर्स घरी आली व तिने औषधोपचार केला तसेच काही औषधेही दिली होती. 25 जूनला गावातीलच एक परिचित महिला रिचमू सेलूकरच्या घरी आली. तिने या बाळाला पाहिले आणि सांगितले की, तिचे पोट फुगले आहे, नाकातून पाणी वाहत आहे. बाळाला डंबा (चटके) दिला तर तब्येत ठणठणीत होईल असे सांगत काही वेळातच तिने विळ्याने बाळाच्या पोटावर चटके दिले
जुलैला परिचारिका बाळाची प्रकृती जाणून घेण्यासाठी घरी आली असता तिला बाळाच्या पोटावर चटक्यांचे व्रण दिसले. तिने बाळाला तातडीने काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर अचलपूरच्या स्त्री रुग्णालयात दाखल केले. बाळावर उपचार करून ५ जुलैला रुग्णालयातून बाळाला सुटी देण्यात आली आहे. बाळाची प्रकृती चांगली आहे मात्र चटके देणाऱ्या महिलेविरुद्ध चिखलदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे यांनी सांगितले
मेळघाटातील एका आदिवासी चिमुकल्याला पोटाचा विकार झाला म्हणून अंधश्रद्धेतून गरम विळ्याचे चटके देण्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावर काँग्रेसच्या नेत्या व माजी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. अतिशय धक्कादायक घटना आहे. बाळाला 39 चटके देण्यात आले, मेळघाट मध्ये हे कालांतराने काही दिवस लोटले की परत या घटना घडत असते. भूमका हा प्रकार आहे तो अंधश्रद्धे मधून आहे. मागील वेळी सरकारने भूमक्याना ट्रेनिंग देण्यात आलं होतं, त्यांच्याकडून मदत घेण्यात आली होती मात्र तो कुठे फेल पडल ते माहिती नाही. तर एकीकडे आपण चंद्रावर जायच्या गोष्टी करतो चंद्रावर घर बांधण्याचा विचार करतो पण आपल्या पृथ्वीवर आपल्या देशामध्ये महाराष्ट्रावर भूमके अधिक अंधश्रद्धा वाढवत आहे यावर सरकार काहीच करताना दिसत नाही याचं आश्चर्य वाटतं अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली
मेळघाटात लहान बालकांना चटके देण्याचा प्रकार अनेक वेळा घडताना दिसत आहे. मेळघाटात अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहे. याकरिता आदिवासींना शिक्षित करण्याची गरज असून तसेच शिक्षणाच्या व आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून प्रबोधनाची गरज आहे. तसे पत्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वेळोवेळी प्रशासनाला दिलेले आहे. आम्ही प्रशासनाची मदत करायला तयार आहो. हे प्रकार घडू नये यासाठी मेळघाटात शिक्षण व्यवस्थेतही बदल घडवण्याची गरज आहे. तसेच सर्व स्तरातून असल्या प्रकारावर प्रबोधन करण्याची गरज असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणणं आहे
काय आहे नेमकी प्रथा?
डंबा दिल्यामुळे पोटफुगी कमी होते ही अंधश्रद्धा आहे. विविध कारणांनी लहान बाळांचे पोट फुगते, पोट फुगल्यानंतर त्याच्या पोटावर चटके (डंबा) दिले की पोटफुगी बरी होते, असा ग्रामीण तथा आदिवासी समाजात अनेकांचा गैरसमज (अंधश्रद्धाही) आहे. चार महिन्यांपूर्वीही चिखलदरा तालुक्यातीलच थिमोरी गावातील एका २२ दिवसांच्या बाळालासुद्धा अशाच प्रकारे डंबा देण्यात आला होता.