राज्यातील शाळांमध्ये हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला मनसे आणि शिवसेनेकडून झालेल्या विरोधानंतर आता राज्यात मराठी-हिंदी भाषेचा वाद पेटला आहे. महाराष्ट्रात राहूनही मराठीला दुय्यम स्थान दिलं जात असल्याने स्थानिक पक्षांकडून संताप व्यक्त केला जात असून, यामुळे ठिकठिकाणी विरोध होत आहे. या विरोधातूनच काही ठिकाणी हिसक घटना घडत आहे. नुकतंच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिरा रोडमध्ये एका उद्योजकाच्या कानाखाली लगावल्यानंतर गुजराती, मारवाडी व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच आता एका उद्योजकाने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आपण मराठी शिकणार नाही, जे हवं ते करा असं आव्हानच दिलं आहे.
सुशील केडिया यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “राज ठाकरे याची नोंद घ्या की, मागील 30 वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता तुमच्या अती गैरवर्तनामुळे मी निश्चित केलं आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत आहे तोपर्यंत मराठी शिकणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे बोल?”.
सुशील केडिया यांच्या पोस्टवर काहींनी कमेंट केल्या आहेत. यामधील एकाने म्हटलं आहे की, “मारहाणीला विरोध करता तर भाषेच्या अपमानालाही विरोध केला पाहिजे. मारहाण करणारे मनसैनिक जर राष्ट्रीय माध्यमांना दिसत असतील तर मराठीचा अपमान करणाऱ्या परप्रांतियांकडे डोळेझाक का?”. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, “मराठी भाषा न शिकणे हा त्यांचा अपमान नाही. पण मराठीच्या नावाखाली हलक्या दर्जाचे राजकारण आणि गुंडगिरी करणे हा त्यांचा अपमान आहे हे निश्चितच आहे”.
दुसऱ्या एका युजरने कमेंट केली की, “ही वृत्तीच समस्या आहे. त्या व्यक्तीला मारहाणही झाली कारण त्याने मराठीबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलल्या. असे बरेच लोक आहेत जे म्हणतात की भाऊ, मला मराठी येत नाही, कृपया हिंदीत बोला. त्यांना कोणीही मारहाण करत नाही”.
त्यावर सुशील केडिया म्हणाले की, “गप्प बसा आणि गुंडागिरीचे समर्थन करणे थांबवा. प्रत्येकजण नेहमीच सभ्य आणि सुसंस्कृत असतो की आपल्याला मदत हवी आहे, कृपया या भाषेत बोला. ही गुंडगिरी लोक करत नाहीत तर अयशस्वी राजकीय पक्ष फक्त लक्ष वेधण्यासाठी करतात. उगाच स्पष्टीकरण देऊ नका. गुंडगिरीसाठी माफी मागा किंवा तुरुंगात जा”.