‘दोघा भावांमध्ये रक्ताची ओढ,’ राज-उद्धव युतीसाठी चळवळ उभे करणारे सतिश वळुंज यांनी व्यक्त केल्या भावना, ‘मी बाळासाहेबांसमोर…’


Satish Walunj on Raj Uddhav Alliance: दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येतील यात कोणतीही शंका नाही. या दोघा भावांमध्ये रक्ताची ओढ आहे. हा धागाच यांना एकत्र आणत आहे अशी भावना दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी चळवळ उभे करणारे जुनेजाणते शिवसैनिक सतिश वळुंज यांनी मांडली आहे. राज यांचं उद्धव ठाकरेंवर खूप प्रेम आहे असंही ते ‘झी 24 तास’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत. 2010 पासून राज-उद्धव यांनी मन मोठं करत महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र यावं अशी चळवळ त्यांनी उभी केली आहे. 

“दोघे भाऊ एकत्र येतील असं वाटत आहे. पहिल्यांदा सकारात्मक पावलं पडली आहेत. याआधी हा विषय येत होता, चर्चा होत होती, ऑफर्स येत होत्या पण त्याची परिणीती चांगल्या गोष्टीत होण्यापेक्षा हेटाळणीत होत होती. मुख्य नेते प्रतिक्रिया देत नव्हते. पण पहिल्यांदा असं झालं की, महेश मांजरेकरांनी मुलाखत घेतली आणि राज ठाकरेंनी केलेल्या विधानाला उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. हे थेट दोन नेत्यांमध्ये झाल्याने मधे कार्यकर्त्यांमध्ये होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया बाजूला गेल्या. त्यातून एक सकारात्मक पाऊल पडलं,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

“या विषयावर बोलताना त्रास होतो. ही फक्त माझीच नाही तर प्रत्येक मराठी माणसाची प्रतिक्रिया आहे. मी बातम्या पाहत नसल्याने काय सुरु आहे हे माहिती नव्हतं. नंतर अचानक फोन आले आणि समजलं. मी याबद्दल बोलत असताना शेजारी उभी एक गरीब बाई व्यक्त झाली आणि आनंदी झाली. हीच मराठी माणसाची प्रतिक्रिया आहे,” असंही ते म्हणाले. 

“राज-उद्धव व्यासपीठावर एकत्र येतील तो क्षण माझ्यासाठी फार महत्त्वाचा असेल. मी याचं श्रेय घेत नाही. माझ्या मागे लोक उभे राहिले, जी प्रसिद्धी मिळाली, माझ्या विचाराला जो लोकांचा पाठिंबा मिळाला त्याचं सर्व श्रेय बाळासाहेबांना जातं. मी फक्त खारीचा वाटा उचलला होता. पण हे स्वप्न मी कित्येक वर्षं पाहत आहे. पण आता ते प्रत्यक्षात येत आहे. ही भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाही. जे ध्येय मी ठरवलं होतं, ते पूर्ण झालं आहे. आता जेव्हा साहेबांपुढे जाण्याची वेळ येईल तेव्हा छाती पुढे करुन जाईन की साहेब काहीतरुन करुन आलो आहे. याशिवाय कोणतीही इच्छा नाही,” अशी भावनाही त्यांनी मांडली. 

“ही बाळासाहेबांचीच पुण्याई आहे. आपण वेगळ्या वाटेने जाऊन काय नुकसान करुन घेतलं आहे हे दोन्ही भावांना दिसलं आहे. महाराष्ट्राची शक्ती विभागली आणि आता तर ती त्रिभागली आहे. भारताच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर, आम्ही लोक विचारांच्या नाही तर व्यक्तीच्या मागे जातो. स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधी, नंतर नेहरु, बिहारमध्ये लालूप्रसाद, उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग तसंच महाराष्ट्रात ठाकरेंच्या, पवारांच्या मागे आहेत. आम्हाला व्यक्तीच लागते आणि ती हे दोघे नव्हे तर चौघे आहेत. त्यांच्या मुलांनाही आम्ही स्विकारलं आहे. मराठी माणसाने ठाकरे कुटुंबावर प्रचंड प्रेम केलं आहे,” असंही त्यांनी सागितलं. 

“दोघे ठाकरे भाऊ एकत्र यावेत याकरता मी बाळासाहेबांसमोरच चळवळ सुरु केली होती. बाळासाहेबांनीही या चळवळीसाठी मला आशीर्वाद दिला होता. दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येतील यात कोणतीही शंका नाही. या दोघा भावांमध्ये रक्ताची ओढ आहे. हा धागाच यांना एकत्र आणत आहे. राजचं उद्धव ठाकरेंवर खूप प्रेम आहे,” असं सतिश वळुंज म्हणाले आहेत. 

उशीर झाला असला तरी एकत्र आले हे महत्त्वाचं आहे. आता सगळं विसरुन गेलं पाहिजे. पाटी कोरी करुन नव्याने सुरुवात करावी असंही मत त्यांनी मांडलं. “आता मागच्या गोष्टी पुसून टाका. पाटी कोरी करुन नव्यानं सुरुवात करा. हे दोघे कधी वेगळे नव्हतेच,” असंही त्यांनी सांगितलं. 

“उद्धव ठाकरेंना छातीत कळ आली, तेव्हा राज ठाकरे धावून आले होते. कुठेतरी ओलावा असल्याशिवाय येणार नाहीत. रक्त हे पाण्यापेक्षा जाडच असते. त्याची महाराष्ट्राला प्रचिती येणार आहे. महाराष्ट्र कोत्या मनाचा नाही म्हणूनच बाहरेच्या इतक्या लोकांना उरावर घेतलं आहे. आम्हाला त्रास देत आहेत, भाषेची सक्ती करत आहेत तरी पोसतच आहोत,” असंही ते म्हणाले. 

पुढे ते म्हणाले, “विठ्ठलाच्या बाजूच्या बडव्यांनी छळलं म्हणून राज ठाकरे सोडून गेले होते असं म्हणत होते. पण आता विठ्ठलानेच दोन्ही बंधूंना दिलेला आशीर्वाद आणि बुद्धी असावी. मराठी माणसू हाच शिवसेनेचा ब्रेड अँड बटर आहे. जर शिवसेना जगवायची असेल, वाढवायची असेल तर मराठी माणसाला वाऱ्यावर सोडता येणार नाही. इतकी वर्षं मराठी माणसाचं नुकसान झालं आहे. राज ठाकरेंनी मारलेल्या फटक्यातून मराठी माणूस सावरलेला नाही. पण आता त्यातून सावरण्याची संधी विठ्ठलाने दिली आहे. महाराष्ट्र तुम्हाला भरभरुन देईल”. हवं तर एकमेकांचे पक्ष विलीन करा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 
 
“मातोश्रीवर मी बाळासाहेबांच्या टेरेस गार्डनमधल्या झाडांची निगा राखायला जायचो. तिथली कीड मी बाजूला केली होती. आता ठाकरेंच्या वटव्रुक्षास लागलेली कीडही बाजुला सारली गेली आहे,” असं उपहासात्मकपणे ते म्हणाले आहेत. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24