हिंगोलीत अखील भारतीय अग्रवाल महासभेच्या वतीने एक वृक्ष आईच्या नावे या उपक्रमाला गुरुवारपासून ता.३ सुरवात करण्यात आली आहे. या उपक्रमातून पहिल्याच दिवशी ५० झाडे लावण्यात आली असून पुढील काही दिवसांतच एक हजार झाडे लाऊन त्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेण्
.
हिंगोली येथील अखील भारतीय अग्रवाल महासभेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत एक वृक्ष आईच्या नावे हा उपक्रम राबविण्याचा निर्णय महिला सभेच्या वतीने घेण्यात आला. त्यानुसार शहरातील ओपनस्पेस व रस्त्याच्या दुतर्फा रोपांची लागवड करून त्याचे संगोपन करण्याचेही ठरविण्यात आले. या रोपांना ट्री गार्ड बसवून त्याची सुरक्षा ठेवणे व पावसाळ्यानंतर या वृक्षांना पाणी देऊन त्यांची काळजी घेतली जाणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने देशी वाणांची झाडे लावली जाणार असून त्यात वड, पिंपळ, आवळा, जांभूळ, सिताफळ, करंज, आंबा या प्रमुख झाडांचा समावेश आहे. शहरासह जिल्हाभरातील नर्सरीतून देशी वाणांची रोपे उपलब्ध करून घेतली जाणार आहेत.
त्यानुसार आज या उपक्रमाला सुरवात झाली असून शहरालगत श्रीनगर भागात रस्त्याला लागूनच वृक्षारोपन करण्यात आले. महासभेच्या प्रांतीय अध्यक्षा सीमा पंच, पुष्पा बगडीया यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमात आज ५० झाडे लावण्यात आली आहेत. यावेळी महासभेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. निता बगडीया, डॉ. कंचन बगडीया, रश्मी केडीया, नेहा अग्रवाल, रक्षा बगडीया, कुसुम अग्रवाल, मीनाक्षी बगडीया, स्वप्ना अग्रवाल, रुपाली बगडीया, नीता कयाल, रुचीता अग्रवाल, टीना लदनीया, किरण अग्रवाल, अभिलाषा भारूका यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.
एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
सध्या ग्लोबल वार्मिंगसाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आहे. या शिवाय कोविड काळात प्रत्येकालाच ऑक्सीजनचे महत्व पटले आहे. त्यामुळेच महासभेने वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला असून यावर्षी पावसाळ्यात एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प आहे, असे अग्रवाल महासभेच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर नीता बगडिया यांनी यावेळी सांगितले.