Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार झारखंड आणि नजीकच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून, मान्सूनचा प्रभाव असणारा कमी दाबाचा एक पट्टा बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्यातच राजस्थानच्या आग्नेयेपासूनही बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं देशासह राज्याच्या विविध भागामध्ये कमीजास्त प्रमाणात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात कोकण आणि घाटमाथ्यावरील परिसरामध्ये पावसाचा जोर कायम असून इतक्यात तरी या भागातून ढगांची दाटी उघडीप देण्याची चिन्हं नाहीत. उलटपक्षी इथं पावसाचा जोर आणखी वाढणार असून त्या धर्तीवर हवामान विभागानं कोकण आणि घाट क्षेत्राला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, नाशिक आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा यलो अलर्ज जारी करण्यात आला आहे. राज्यात प्रामुख्यानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरातील घाट क्षेत्रांना पावसाचा मारा सोसावा लागणार आहे.
इथं मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहणार असून, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरी मुंबईकरांची तारांबळ उडवणार आहेत. तर, ठाणे आणि उपनगरीय क्षेत्रांमध्येसुद्धा चित्र वेगळं नसेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
सध्याची एकंदर हवामान प्रणाली पाहता 6 जुलैपासून महाराष्ट्रातील कोकण आणि घाट भागात पावसाळी गतिविधींमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, विदर्भ आणि उत्तर मराठवाडा येथील काही भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे या भागात पावसाची आकडेवारी सुधारेल. ही गतिविधी पुढेही सुरू राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
Heavy to very heavy rainfall very likely to occur at isolated places in the districts of South Konkan-Goa and in ghats area of South Madhya Maharashtra. pic.twitter.com/nE0ICtCng0
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 2, 2025
देशभरातील हवामानाचा आढावा….
‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार देशाच्या ओडिशा, झारखंड, उत्तर छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या भागांसह कोकण, गोवा, केरळ, हिमाचल प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर, दाक्षिणात्य राज्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.