ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई: वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना मिळणारी शासकीय मदत वाढवण्यासाठी विधानसभेत चर्चा झाली. मात्र या चर्चेला वेगळंच वळण लागल्याचं पाहायला मिळालं. जंगलातल्या वाघाची चर्चा राजकीय वाघापर्यंत येऊन पोहचली. विषय वाघाचा होता तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना शालजोडीतले लगावण्याची संधी सोडली नाही. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांच्या तासात आस्कमिक मृत्यूच्या मदतीचा मुद्दा जंगलातल्या वाघापासून राजकीय वाघापर्यंत गेल्याचं पाहायला मिळालं. नैसर्गिक आपत्तीत मृत्यू होणाऱ्या शेतक-यांच्या कुटुंबाला सरकारकडून 4 लाख मदत दिली जाते. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही मदत 4 लाखांवरुन दहा लाख करण्याची मागणी केली.
वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला पंचवीस लाख मिळतात तसे आपत्तीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकालाही वाढीव मदत देण्याबाबत विचार करु असं आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजनांनी दिलं.
विषय इथंच थांबेल तर कसलं. विधानसभा अध्यक्षांनी नैसर्गिक आपत्ती आणि वाघाचा हल्ला या दोन वेगळ्या घटना असल्याचं सांगितलं. नेमका हाच धागा पकडून सुनील प्रभूंनी वाघावर कुणाचा कंट्रोल आहे असा प्रश्न विचारला. यावर राहुल नार्वेकरांनी वाघावर सध्या कुणाचा कंट्रोल ते समजत नसल्याचा टोला लगावला. तेवढ्यात भाजपच्या अतुल भातळखळांनी वाघाची शेळी झाल्याचा शाब्दिक टोला लगावला. जितेंद्र आव्हाडांनी यावरही कोटी केली. तुमच्या बोलण्याचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी नाही ना असा प्रतिटोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
सध्या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा विषय राज्यभर चर्चिला जातोय. विधानसभेत वाघाचा वेगळा विषय होता. पण सत्ताधारी आणि विरोधकांनी वाघाचा तो मुद्दा भलतीकडंच नेला. सत्ताधाऱ्यांना वाघाबाबत जे बोलायचं होतं ते बोलले. विरोधकांनीही वाघाच्या विषयावर सत्ताधाऱ्यांचे चिमटे काढले. एरव्ही राजकीय वाघाच्या मुद्यावर तावातावाने बोलणारे राजकीय नेत्यांनी सभागृहात हा मुद्दा अतिशय हलक्याफुलक्या हास्यविनोदावर संपवला.