चंद्रकांत फुंदे झी 24 तास पुणे : पुण्यातील एका ज्वेलर्सवाल्यानं गोरगरिबांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. विष्णू दहिवाल नावाच्या ज्वेलर्सकडे पुण्यातील काही महिलांनी भिशी लावली होती. या भिशीचे संपूर्ण पैसे घेऊन या ज्वेलर्सनं पोबारा केला आहे. दरम्यान पोलिसांकडून विष्णू दहिवालचा शोध घेण्यात येत आहे. नेमकं प्रकरण काय आहे.
पुण्याच्या धायरीतील श्री ज्वेलर्सच्या दुकानासमोर जमा झालेल्या या गोरगरिब महिलांची भिशीच्या नावाखाली मोठी फसवणूक झाली आहे.जास्तीच्या व्याजाचं अमिष दाखवून या विष्णू दहिवाल ज्वेलर्सनं परिसरातील तब्बल 1 हजार महिलांना फसवलं आहे. या महिलांचे भिशीचे पैसे घेऊन हा ज्वेलर्स आता पसार झाला आहे.
कुणी आपले लाखमोलाचे दागिने ज्लेलर्सवाल्याकडे गहाण ठेवले होते तर कुणी लग्नाचे दागिणे बनवण्यसाठी ऍडव्हांस देऊन ठेवला होता. आधीही या भामट्या ज्वेलर्सवाल्यानं दुकानात दरोड्याचा बनाव रचला होता..मात्र, त्याचा तो डाव फसल्यामुळे त्यानं आता गोरगरिबांचे कोट्यवधी रुपये घेत पळ काढला आहे.
एका कचरा वेचणाऱ्या महिलेनं घर घेण्यासाठीचे जमा केलेले तब्बल 22 लाख रूपये या ज्वेलर्सवाल्याकडे ठेवले होते. मात्र, तेही पैसे घेऊन हा ज्वेलर्स पळून गेला आहे. कोट्यवधी पैसे घेऊन पोबारा झालेल्या या ज्वेलर्स पोलिसांकडून शोध सुरू आहे. मात्र, आधीच दरोडा बनाव केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला योग्य धडा शिकवला असता तर ही वेळ आली नसती.. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही संशय निर्माण होत आहे.