Vande Bharat Depot: भारतीय रेल्वेने पश्चिम आणि मध्य रेल्वेने वंदे भारत गाड्यांच्या डेपोसाठी हलचाली सुरु केल्या आहेत. या डेपोसाठी संभाव्य ठिकाणांची जागा निवडण्यास मध्य आणि पश्चिम रेल्वे सांगण्यात आलं आहे. पश्चिम रेल्वेने कनेक्टिव्हिटीचा आणि भविष्यातील विस्ताराचा विचार करुन पश्चिम द्रुतगती मार्गाजवळच्या जोगेश्वरी-राम मंदिर स्थानकांदरम्यानचा सहा एकरचा परिसर निवडला आहे. त्यावेळी मध्य रेल्वेने सीएसएमटीजवळील वाडी बंदरच्या जागेची निवड केली आहे. या दोन्ही ठिकाणांवर लवकरच डेपो उभारण्याचे काम सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या डेपोंमध्ये नेमकं असणार काय?
दोन्ही ठिकाणांवरील डेपो उभारणाऱ्या या प्रकल्पाचे प्राथमिक काम लवकरच सुरू होणार आहे. प्रस्तावित डेपो कार्यान्वित झाल्यानंतर, सुरुवातीला 5 ते 10 गाड्यांची देखभाल-दुरुस्ती केली जाईल. तसेच भविष्यात ही क्षमता टप्प्याटप्प्यात वाढवली जाणार आहे. एका वेळेस 50 गाड्यांची देखभाल करण्याची क्षमता या डेपोची असणार आहे. 160 किमी प्रतितास वेगाने धावण्यासाठी डिझाइन केलेल्या वंदे मालिकेतील गाड्या भारतीय रेल्वेच्या ताफ्यातील प्रिमिअम गाड्यांपैकी आहेत. या गाड्या महत्त्वाच्या इंटरसिटी मार्गावर धावतात. पश्चिम रेल्वेने अशाच प्रकारच्या डेपोसाठी साबरमती आणि इंदूरमध्ये आधीच जागेचे नियोजन केले आहे.
77 कोटी रुपये खर्च करुन बांधलेले प्लॅटफॉर्म्स कसे असतील?
वंदे भारत एक्स्प्रेस डेपो आगामी जोगेश्वरी टर्मिनसजवळ आहे. सध्या ही जागा रेल्वेकडून डम्पिंग ग्राऊण्डसारखी वापरली जाते. या ठिकाणी रिकामा रेल्वेचे डबे, रेल्वेचं टाकावू सामान आणि इतर गोष्टी असून हा परिसर आकाराने फार मोठा आहे. या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर 2025 जोगेश्वरी टर्मिनस सुरू करण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन आहे. एलटीटीनंतर तब्बल तीन दशकांहून अधिक काळातील मुंबईतील पहिले ग्रीनफील्ड रेल्वे टर्मिनस जोगेश्वरी टर्मिनस असेल. 77 कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या या टर्मिनसमध्ये तीन प्लॅटफॉर्म (एक बेट आणि एक होम प्लॅटफॉर्म) असतील. प्रत्येकी 600 मीटर लांबीचे हे फ्लॅटफॉर्म्स 24 डब्यांच्या गाड्या हाताळण्यास सक्षम असणार आहेत.
इतर गाड्यांना विशेष परवानग्या आवश्यक
डेपोच्या विकासामुळे जोगेश्वरीहून वंदे भारत गाड्या सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच येत्या ऑगस्टपर्यंत मुंबई-अहमदाबाद मार्गावर रेल्वेगाड्या 160 किमी प्रतितास वेगाने धावण्याची शक्यता आहे. वंदे भारत आणि स्लीपर एक्स्प्रेसला या वेगासाठी मान्यता मिळाली असली तरी, राजधानी आणि शताब्दीसारख्या जुन्या प्रीमियम गाड्यांना जलद धावण्यासाठी विशेष परवानग्या आवश्यक आहेत.
गाड्यांची संख्या वाढणार
वंदे भारत गाड्यांना असणारी मागणी दिवसोंदिवस वाढत असून या गाड्यांच्या माध्यमातून अधिक जलद प्रवास शक्य झाला आहे. आता या नव्या टर्मिनसमुळे वंदे भारत गाड्यांची देखभाल मुंबई सीएसएमटी आणि जोगेश्वरीसारख्या मोक्याच्या ठिकाणी होणार असल्याने या भागातून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.