Narayan Rane Slams Uddhav Thackeray: हिंदी भाषेचा इयत्ता पाहिलीपासून शालेय शिक्षणात समावेश करुन घेण्याचे दोन शासन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजयी मेळावा आयोजित केला जात आहे. 5 जुलैच्या या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा सहभागी होणार आहे. मात्र या विजयी मेळाव्यावरुन माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
उद्धव यांनी राज ठाकरेंना छळले
नारायण राणेंनी त्यांच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन, राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांना उद्धव ठाकरेंनीच त्रास दिला होता असं म्हटलं आहे. “उद्धव ठाकरे सन्माननीय राजजी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राजजी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत,” असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे.
हिंदूंनी उद्धव ठाकरेंना घरी बसवले
“सन्माननीय राजजी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे मध्ये नाही! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती,” अशी खोचक टीका नारायण राणेंनी केली आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 1, 2025
उद्धव ठाकरेंचं कल्याण झालं, मराठी माणसाचं काय?
अन्य एका पोस्टमध्ये नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंनी मुलांना मराठी शाळेत का शिकवलं नाही असा सवाल केला आहे. “उद्धव ठाकरे यांचे मराठीचे प्रेम बेगडी, राजकीय व स्वार्थापोटी आङे. मुख्यमंत्र असताना हे प्रेम कुठे गेले होते? मराठी मासणाच्या नोकरी, धंदा व पोटाच्या प्रश्नासाठी काय केले? मराठीच्या नावावर केवळ आपले कल्याण करुन घेतले. मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय? महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी 18 टक्क्यांपर्यंत खाली आली याचा जबाबदार कोण? मराठीबद्दल इतकेच प्रेम होते तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले? सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असेच म्हणावे लागेल,” असं नारायण राणे म्हणाले आहेत.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 30, 2025
मेळाव्याच्या तयारीसाठी दोन्ही सेनेच्या नेत्यांची भेट
सोमवारी रात्री मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची झाली भेट. सांताक्रुजच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये या तिन्ही नेत्यांची भेट झाली. विजयी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. वरळी डोमची निश्चिती झाल्यानंतर कार्यक्रमाची वेळ आणि कार्यक्रमाच्या रूपरेषेवर चर्चा झाली. कार्यक्रमात पक्षांच्या प्रमुखांचीच भाषणे होण्याची शक्यता अधिक आहे. राज ठाकरे, उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आणि काँग्रेस पक्षाचे नेते भाषण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.