भाजप खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना छळले होते. त्यांना
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे वादग्रस्त त्रिभाषा धोरण रद्द करण्याची घोषणा केली आहे. यासंबंधीचे 2 वादग्रस्त जीआर त्यांनी मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर राज व उद्धव ठाकरे यांनी 5 जुलै रोजी मुंबईत विजयी मेळावा घेण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते यासंबंधी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सन्माननीय राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज यांना छळले होते. त्यांना त्रास दिला होता. त्याची यांना जाणीव नाही वाटते? आणि आता का म्हणून ते लाळ ओकत आहेत.
राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी आयुष्य दिले. पण त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवले. पण याने (उद्धव) सत्ता घालवली. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसवले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे यांच्यात नाही. जो बूंद से गई वो हौद से नाहीं आती, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंचे मराठी प्रेम अत्यंत बेगडी
उल्लेखनीय बाब म्हणजे नारायण यांनी सोमवारीही उद्धव ठाकरे यांचे मराठी प्रेम बेगडी असल्याची टीका केली होती. ते म्हणाले होते, उद्धव ठाकरे यांचे मराठीचे प्रनेम बेगडी, राजकीय व स्वार्थापोटी आहे. मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेले होते? मराठी माणसाच्या नोकरी, धंदा व पोटाच्या प्रश्नासाठी काय केले? मराठीच्या नावावर त्यांनी केवळ आपले कल्याण करून घेतले. मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय? महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी 18 टक्क्यांपर्यंत खाली आली याला जबाबदार कोण?
मराठीबद्दल इतकेच प्रेम होते, तर स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले? सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असेच म्हणावे लागेल, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
5 जुलैला विजयोत्सव -उद्धव ठाकरे
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीचे जीआर रद्द केल्याप्रकरणी 5 जुलै रोजी विजयोत्सव साजरा करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, 5 जुलै रोजी विजयोत्सव साजरा केला जाईल. आम्ही सर्वांशी संवाद साधत आहोत. ज्याप्रमाणे आंदोलनात आमच्यासह सर्वजण एकत्र उतरले होते. तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवात दाखवण्याची गरज आहे. या सरकारने सुरूवातीला मराठी – अमराठी करत मराठी भाषिकांत फूट पाडण्याचा डाव रचला होता. मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आणि त्यानंतर त्याचा फायदा घ्यायचा. पण मराठी भाषिकांत फूट पडत नसल्याचे दिसताच त्यांनी मराठी माणूस एकत्र येऊ म्हणून त्यांनी हा जीआर रद्द केला आहे.
कमळीवर कोणत्या भाषेची सक्ती होती का?
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपचा उल्लेख कमळी असा केला. ते म्हणाले, या सरकारच्या मंत्र्यांचे रोज कोणते न कोणते पापं बाहेर येत आहेत. शेतकऱ्यांचे विषय तसेच प्रलंबित आहेत. आदित्य ठाकरे यांनी काल-परवा अकरावीच्या प्रवेशाचा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर सरकारने प्रवेश यादी जाहीर केली. मला उत्सुकता आहे की, ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली. कारण मार्क्स मिळाले शंभर पैकी शंभर ही कमळी आमची एक नंबर. आता ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली? त्या कमळीवर कोणत्या भाषेची सक्ती होती का? तिने 100 मार्क कसे मिळवले? या 100 मार्गात तिने ईव्हीएम वापरले होते का? हे पाहण्याची मला उत्सुकता आहे. त्यामुळे कमळी एक नंबर आहे असे म्हणणारे कोण आहेत? हे मला पाहायचे आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी भाजपवर शरसंधान साधताना म्हणाले.