Maharashtra Assembly Monsoon Session 2025: विधानभवनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोमवारपासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. मात्र पहिल्या दिवशी शिंदेंना कार्यालय मिळालं नसल्याची कुजबूज विधानसभेच्या आवारात ऐकू येत होती. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे दालन तर विधानभवनात आहे, पण आतापर्यंत विधानभवनात असलेले त्यांचे कार्यालय मात्र हद्दपार झाले आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदेंना दालन आहे पण कार्यालय नाही, अशी अवस्था झाल्याचं दिसून आलं.
नेमका गोंधळ काय?
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे दालन विधानभवनच्या तळमजल्यावर आहे. त्याच्या बाजूला एक कक्ष आहे. हे कक्ष शिंदेंचे प्रधान सचिव नवीन सोना वापरतात. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी एक स्वतंत्र मोठे दालन पहिल्या माळ्यावर होते. तेथे त्यांचे पीएस, ओएसडी, जनसंपर्क अधिकारी, सहसचिव, उपसचिव बसायचे. आता मात्र त्यांना बसायला जागा नाही. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या सगळ्यांना मंत्रालयात बसावे लागले.
झेरॉक्स कॉपी काढायचीही सोय नाही
शिंदे यांचा स्टाफ पहिल्या माळ्यावरील विधिमंडळाच्या ज्या दालनात अर्थसंकल्पीय अधिवेशनात बसत होता ते दालन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना मुळात देण्यात आले होते. गेल्या अधिवेशनात तेथे शिंदेंच्या स्टाफला तात्पुरती जागा देण्यात आली होती. ते मोठे दालन आता अंबादास दानवे यांनी घेतले आहे आणि त्यांच्या कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी ठिकाणी बसत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी झेरॉक्स कॉपी काढायचीही सोय नाही, अशी अवस्था आहे.
8 दिवसांपूर्वी शिंदेंनी केली होती दालनाची मागणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयाला आठ दिवसांपूर्वीच पत्र पाठवून माझ्या ‘स्टाफ’साठी दालन द्या अशी मागणी केली होती मात्र अजून दालन मिळालेले नाही.
दालने सोडायला तयार नाही
तळमजल्यावरील शिंदे यांच्या 2 दालनाच्या जवळची दोन-तीन दालने आपल्याला मिळतील, अशी शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, काही दिवसांपासून ही दालने विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना देण्यात आली आहेत. पर्यायी व्यवस्था होत नसल्याने ते 3 ही दालने सोडायला तयार नाहीत. त्यामुळे गोंधळात भर पडली आहे.