Congress Ramesh Chennithala News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीतून महायुतीत अनेक नेते, पदाधिकारी यांचा प्रवेश मोठ्या प्रमाणावर होत आहे. ठाकरे गटासह काँग्रेसलाही आता एकामागून एक धक्के बसत आहेत. यातच ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत खलबते झाली. काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत बैठकांना उपस्थिती दर्शवली. यानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेत्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबाबतची रणनीती काय असेल, याबाबत सांगितले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काय भूमिका घ्यायची आहे, त्यासाठी सात तारखेला बैठक होणार आहे. ही बैठक मुंबईत होणार आहे. आमचे सचिव व्यंकटेश आणि मी त्या बैठकीत सहभागी होणार आहोत. ०७ तारखेला अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी दिली. तसेच कार्यकर्त्यांनी भावना अशी आहे की, प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढले पाहिजे. सर्व ठिकाणी उमेदवार दिले पाहिजेत. कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ही स्थानिक पातळीवरील निवडणूक आहे. यावर अध्यक्षांची चर्चा करावी लागेल, असे चेन्नीथला यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती. ठाकरे बंधू एकत्र आल्यास काँग्रेस त्यांच्यासोबत जाणार का, असा प्रश्न रमेश चेन्नीथला यांना विचारण्यात आला. राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारत असे काही नाही. भारत एक आहे. उत्तर भारतीयांना काँग्रेसने मजबूत केले आहे. त्यांना अनेकदा संधी दिली आहे. काँग्रेस आपली विचारधारा घेऊन पुढे जाईल. जर राज ठाकरे सोबत येण्याबाबत काही होत असेल, तर त्याचे काय करायचे त्यावर नंतर विचार केला जाईल. अजून तरी ठाकरे बंधू एकत्र येणार का, हे निश्चित झालेले नाही. परंतु, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत ७ तारखेला आम्ही निर्णय घेणार आहोत, असे चेन्नीथला यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बैठकीत संघटना मजबूत करण्यावर आमची चर्चा झाली. पुढे काय केले पाहिजे, यावर मंथन झाले. यात सर्वांनी आपली मते मांडली. आगामी तीन महिन्यात पक्षाची वाटचाल कशी असेल, याबाबत काही गोष्टी ठरवण्यात आल्या आहेत. आघाडी कायम ठेवायची की नाही, याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे. दिल्लीतील ही बैठक झाल्यानंतर आता महाराष्ट्रात जिल्हा, विभागवार पातळीवरील नेत्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
#WATCH | Delhi | Congress leader Ramesh Chennithala says, “On 7th July, there will be a meeting of the political affairs committee in Mumbai to decide the strategy for the Mumbai Corporation Elections…” pic.twitter.com/3ZWkinJz07
— ANI (@ANI) June 30, 2025