किराणा दुकान, पानपट्टीत गुटखा विक्री करणाऱ्या पाच जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४९ हजार ९०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
.
राहुल प्रकाश संचेती (वय ३२, रा. शंभुराजे मित्र मंडळाजवळ, आंबेगाव), प्रमोद प्रकाश संचेती (वय ३६, रा. आंबेगाव), रवींद्र राजकुमार वाकडे (वय २६, रा. संतोष नगर, कात्रज), सुनील दगडु सुरवसे (वय २४, रा. वडगाव) आणि प्रशांत बच्चा कुलाल (वय ४१, रा. आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी अजय कामठे यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे. आंबेगाव, कात्रज, वडगाव भागातील दुकाने, तसेच पानपट्टीत गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने चार ठिकाणी छापा टाकला. त्यांच्याकडून गुटखा जप्त करण्यात आला.
पोलिस उपायुक्त स्मार्तन पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर, शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, बाबासाहेब पाटील, निलेश जमदाडे, अजय कामठे, हरीश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांनी ही कारवाई केली.
घरात गावठी दारूचा अड्डा चालविणारी महिला अटकेत
घरात गावठी दारुचा अड्डा चालविणाऱ्या महिलेला खडक पोलिसांनी अटक केली. भवानी पेठेतील कासेवाडीत छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली. राधा अनिल सोनवणे (वय ५०, रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिस कर्मचारी आशिष चव्हाण यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा सोनवणे ही कासेवाड परिसरात घर भाड्याने घेऊन राहत आहे. ती घरात गावठी दारू विक्रीचा अड्डा चालवित असल्याची माहिती पोलिस कर्मचारी आशिष चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. सोनवणेच्या घरातून ३५० लिटर गावठी दारू, चार हजार ३४० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा सोनवणेने घर भाडेतत्त्वावर घेतले होते. गावठी दारुची विक्री ती करत होती. पोलिस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे तपास करत आहेत.