कचऱ्याच्या ट्रकने अचानक वळण घेत एका दुचाकीला धडक दिली व त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. दुचाकीवरील एक महिला व १२ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी हा अपघात झाला असून, परिसरात तणावाचे वातावरण होते.
.
मिळालेल्या माहितीनुसार, वाठोड्यातील डम्पिंग यार्डजवळील धर्मकाट्याजवळ हा अपघात झाला. नितीन पंचेश्वर (२०) हा दुचाकीस्वार तरुण या अपघातात मृत्यूमुखी पडला. तर सारा गाडेकर (४०) व आदर्श (१२) हे गंभीर जखमी झाले.
महानगरपालिकेचा एमएच ४९-एटी ६०९२ हा कचरा संकलन ट्रक डम्पिंग यार्डजवळील धर्मकाट्याकडे वळला, तेव्हा ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, रस्त्यावर चिखल होता आणि ट्रकने सिग्नल न देता अचानक वळण घेतले, ज्यामुळे वेगाने जाणारी एमएच ४९-सीजे ४१८० दुचाकी अनियंत्रित झाली आणि अपघात झाला. अपघात इतका भीषण होता, की दुचाकी ट्रकच्या खाली अडकली व नितीनचा जागीच मृत्यू झाला, तर सारा आणि आदर्श गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. जखमी महिला आणि मुलाला तातडीने पारडी येथील भवानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.