राज्यातील शेतकऱ्यांविरुध्द अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे नेते तथा माजीमंत्री बबनराव लोणीकर यांच्या छायाचित्राला सेनगाव व डोंगरकडा येथे ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ता. 27 जोडेमारो आंदोलन केले. लोणीकरांना चाबकाने फोडून काढ
.
राज्यातील शेतकऱ्यांविरुध्द अपमानास्पद वक्तव्य केल्याने भाजपा नेते तथा माजीमंत्री बबनराव लोणीकर यांच्या विरोधात संतापाची लाट उठली आहे. त्यांच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. हिंगोली जिल्हयातही ठाकरे गटाचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. आज सकाळी सेनगाव येथे लोणीकर यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन करून त्यांचा निषेध केला. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, तालुका प्रमुख संतोष देवकर, जगदिश देशमुख, पिंटू गुज्जर, प्रविण महाजन, देविदास कुंदर्गे, दत्तराव तिडके, वैभव देशमुख, मंगेश पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी लोणीकरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
या शिवाय डोंगरकडा येथे ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी पराग अडकिणे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लोणीकरांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत यांनी माजीमंत्री लोणीकर यांच्या वक्तव्याचा तिव्र शब्दात निषेध केला. शेतकऱ्यांविरुध्द अपमानास्पद बोलणाऱ्या लोणीकरांना हिंगोली दौऱ्यात शेतकऱ्यांच्याच चाबकाने फोडून काढू असा इशारा दिला आहे. तर शासनाने त्यांच्या नेत्यांना तोंड सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला पाहिजे असे मत व्यक्त केला. तसेच लोणीकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणीही गोपू पाटील सावंत यांनी केली आहे.