खेडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेचा जगात डंका, काय आहे यात खास? जाणून घ्या!


हेमंत चापुडे, झी 24 तास, खेड पुणे: आताच्या काळात चांगलं शिक्षण म्हंटल की इंग्रजी शाळा, सीबीएसई शाळेकडेच पाहिलं जातं. पण खेडच्या कन्हेरसर येथील जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेने जगात आपला डंका वाजवलाय. आपले विविध उपक्रम, आंतराष्ट्रीय दर्जांचे शिक्षण, प्रशिक्षण यामुळे शाळेने जगातील टॉप टेनमध्ये स्थान पटकावलं.शाळेची ही किमया काय आहे? 

मग्न होऊन विविध उपक्रम करणारी मुलं, हसत खेळत अभ्यासाचे धडे गिरवणारे, योगा आणि संगीताची साथीने अभ्यासाची गोडी निर्माण करणारे शिक्षक. हे वातावरण एका जिल्हा परिषद शाळेतली आहे, असे सांगून कोणाला विश्वास बसणार नाही. पण खेडच्या जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने आपल्या याच वेगळेपणाने जगात आपली ओळख निर्माण केलीये.

ही शाळा T4 या आंतरराष्ट्रीय एज्युकेशन संस्थेने आयोजीत केलेल्या जागतिक स्पर्धेत टॉप टेन मध्ये आली आहे. ही एकमेव सरकारी जिल्हा परिषदेची शाळा यात सहभागी झाली होती.आणि या शाळेने आपल्या वैशिष्ट्याने आपलं वेगळेपण दाखवून दिलं. फक्त शिक्षणच नाही तर इथे अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मुलांच्या कल्पना, त्यांच्या विचाराला शाळा वाव देते. वेगवेगळ्या प्रयोगांची आणि शिक्षणाच्या नव्या वाटांची ही शाळा आहे. मुलांना या शाळेत कसलीच भीती दबाव जाणवत नाही.रागात, ओरडणारे शिक्षक नसल्याने मुलांना मुक्त व्यासपीठ मिळतंय

झेडपी शाळेची वैशिष्ट्ये

शाळेत विद्यार्थांना आंतराष्ट्रीय दर्जांचे शिक्षण, प्रशिक्षण दिले जातं. विद्यार्थी भारतातील विविध भाषांसह जर्मंन, जॅपनीज, फ्रेंच, नेपाळी सारख्या भाषा शिकतात. विद्यार्थांना 22 प्रकारचे उपक्रम शिकवले जातात. रोबोटिक्स, कोडींग, गार्डनिंग, मेकॅनिक्स आर्ट अँड क्राफ्ट, योगा अँड मेडिटेशन, प्लंबिंग ब्रेन जिमची सुविधा आहे. सकाळी 9 च्या सुमारास शाळा भरते, शाळेत आल्यावर मुलं शाळेची स्वच्छता करतात. हायड्रोपोनिक पद्धतीनं लावलेल्या झाडांची काळजी घेतात. जिल्हा परिषदेत शाळेतली मुलंच कधी कधी मुलांचे शिक्षकही होतात. शाळेला सिमेंटच्या भिंती नाहीत. तर, सरकवून उघडता येतील अशी काचेची दारं आहेत. मोठ्या वर्गातल्या काही मुलांना विषयमित्र म्हणून नेमलं जातं, हा विषयमित्र इतरांना शिकवतो

या शाळेत विद्यार्थ्यांकडून 22 प्रकारचे वेगवेगळे स्किल शिकवले जातात, यांसह विद्यार्थ्यांना भारतातील अनेक स्थानिक भाषांसह जगभरातील भाषाही शिकवल्या जातात.योगनिद्रा, कौशल्य विकास, शारिरीक शिक्षण, संगणकीय ज्ञान, विज्ञानाचे प्रयोग स्वता मुलं करतात. या शाळेची ओळख बदलण्यात आणि त्याला नव्या उंचीवर नेण्यात वारे गुरूजींचा मोठा सहभाग आहे. त्यांनी सरधोपट शाळेची चौकट मोडत शाळेला मुलांच्या मानसिकतेतून तयार केलं.

शाळा म्हणजे पुस्तकांचा गराडा, सतत अभ्यास, ओरडणारे शिक्षक हे चित्र सामान्यता सगळ्याच शाळेत पाहायला मिळतं. त्यातच जिल्हा परिषद शाळा म्हंटल की तिथे काय शिक्षण असं म्हणत आपणही मागे सरकतो. पण जालिंदरनगरच्या या झेडपी शाळेने शिक्षणाची एक नवी दिशा दाखवलीये.

मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत, त्यांना मोकळं-ढाकळं, जग एका नव्या दृष्टीकोनातून दाखवलं जातं. इथे मुलं आवडेल ते करतात, त्यातून शिकतात. या जिल्हा परिषद शाळेने शाळेची व्याख्या नव्याने माडंलीये. जालिंदर नगरच्या या शाळेकडे पाहून राज्यातील इतर शाळांनी व ग्रामस्थांनी एक वेगळा आदर्श व स्फूर्ती घेण्याची गरज आहे.. म्हणजे अशा शाळा गावोगावी तयार होतील आणि  मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24