35 दिवसांच्या बाळावर दुर्मिळ रोबोटिक शस्त्रक्रिया करत रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांच्या टीमने या नवजात शिशूला जीवनदान दिले. ही शस्त्रक्रिया वैद्यकीय क्षेत्रात दुर्मिळ मानली जाते. मूत्रपिंडाच्या आजाराने त्रासलेल्या बाळावर रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात
.
रुबी हॉल क्लिनिकचे रोबोटिक सर्जरी विभागाचे संचालक आणि मुख्य रोबोटिक युरो-ऑन्को सर्जन डॉ. हिमेश गांधी यांनी या शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. दा विंची रोबोटिक प्रणालीच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया पार पडली. अतिशय गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया सुरक्षितेतेने आणि अचूकरित्या करण्यासाठी दा विंची रोबोटिक प्रणालीचा वापर केला जातो. या पद्धतीचा अवलंब करत पेल्विक-युरेटेरिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन आजाराने त्रासलेल्या ३५ दिवसांच्या नवजात शिशूची या आजारातून डॉक्टरांनी सुटका केली.
नवजात शिशूंवर शस्त्रक्रिया करणे हे आव्हान असते. बाळाचे लहान अवयव, नाजूक ऊती यांमुळे शस्त्रक्रियेदरम्यान बाळाच्या जीवाला धोका संभवतो. या शस्त्रक्रियांमध्ये चुकीला वाव नसतो असे डॉ. गांधी म्हणाले. रोबोटिक शस्त्रक्रियांमध्ये हा धोका टाळता येतो, असे सांगत त्यांनी रोबोटिक शस्रक्रियेबद्दल माहिती दिली. या शस्त्रक्रियेत आम्ही मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी वापरल्या जाणा-या सूक्ष्म उपकरणांचा वापर केला. ही रोबोटच्या हाताच्या मदतीने शस्त्रक्रिया केली गेली. बाळाच्या शरीरातील अनावश्यक भाग काढण्यासाठी रोबोटचे हात कामी आले. रोबोटच्या हाताचा वापर करुनच मूत्रपिंड पुन्हा मूत्राशयाला जोडले. आता बाळाला लघवीला त्रास होत नाही. बाळाच्या तब्येतीतही सुधारणा दिसून येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्याचे अनेक फायदे आहेत. गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील शस्त्रक्रियांमध्ये रोबोटचा वापर केल्याने सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचा मुद्दाही डॉ. गांधी यांनी मांडला.यापद्धतीत रोबोटिक हातांमुळे शरीरात केवळ लहान छेद देता येतो. ही शस्त्रक्रिया अचूकपणे करता येते. अनावश्यक भागाजवळील ऊतींना फारसा त्रास न होता शस्त्रक्रिया पूर्ण केली जाते. शरीरावर कमी छेद दिले गेल्याने रुग्ण लवकर बरा होतो.दा विंची प्रणालीमुळे सर्जनला शस्त्रक्रिया होत असलेल्या संबंधित भागातील अंतर्गत हालचाली ३डी दृष्याच्या माध्यमातून पाहता येतात. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले नियंत्रण साधण्यासाठी ही प्रणाली फायदेशीर ठरते.