Pune Crime News : कोकण कड्याच्या दरीत 40 वर्षाचा तलाठी आणि अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दोघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह दरीतून बाहरे काढले. पोलिस अधिक तपास करत आहेत.
पुण्याच्या जुन्नरमध्ये कोकण कड्याच्या दरीत तलाठी आणि एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीचा मृतदेह दरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या असावी असा प्रथमदर्शनी अंदाज आहे. आंबे-हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी आत्महत्या केल्याचे आढळलं आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं तलाठी म्हणून कार्यरत असणारे रामचंद्र साहेबराव पारधी (वय वर्षे 40) आणि जुन्नरच्या आंबोली येथील मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी ही अल्पवयीन असल्याचं बोललं जात आहे.
विजेच्या तारेचा धक्का लागून बाप-लेकाचा मृत्यू
अहिल्यानगरच्या बाळगव्हाण येथील शेतात सोमवारी सायंकाळी विजेच्या तारेचा धक्का लागून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काकासाहेब शिकारे आणि त्यांचा मुलगा गणेश शिकारे अशी मृत व्यक्तींची नावे असून, हे दोघे शेतात कामासाठी गेले होते. मात्र बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध घेत शेतात पाहणी केली तेव्हा दोघांचे मृतदेह शेतात सापडले. मृतदेहाजवळ तुटलेल्या विजेच्या तारा आढळून आल्या. 15 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे विजेच्या तारांमध्ये नुकसान झाले होते. तरीदेखील या तारा दुरुस्त करण्यात न आल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.