बनावट कागदपत्र प्रकरण सादर करुन सनदी अधिकारी झालेल्या पूजा खेडकर प्रकरण ताजे असताना महाराष्ट्रात आणखी एक सनदी अधिकारी वादात सापडले आहेत. सोलापूर महापालिकेचे प्रशासक डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रशासकीय सेवा परीक्षा देताना ओबीसी आणि नॉनक्रिमिलेयर (उन्नत-प
.
पूजा खेडकर प्रकरणानंतर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (यूपीएससी) पुढे आणखी काही तक्रारी आल्या. त्यात डॉ. ओम्बासे यांचे नाव आहे. ते 2015 चे आयएएस अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवा परीक्षेत 2014 चे उमेदवार होते. दरम्यान, पूजा खेडकर या परिवीक्षाधीन (प्रोबेशन) अधिकाऱ्याचे प्रकरण राज्यभर गाजले. परीक्षा देताना त्यांनी सादर केलेली कागपत्रे चौकशीत बनावट निघाली. त्यानंतर त्यांची गच्छंती झाली.
बनावट प्रमाणपत्र बनवल्याचा दावा
2014 मध्ये नागरी सेवा परीक्षा (UPSC) देताना सोलापूर महापालिकेचे प्रशासक आणि आयएएस अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी बनावट OBC-नॉन क्रिमीलेयर (NCL) प्रमाणपत्र सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी याबाबत केंद्र सरकारचे अप्पर सचिव अंशुमन मिश्रा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
कुंभार यांनी पाठवलेल्या तक्रारीसोबत संबंधित पत्रव्यवहाराचे फोटो आणि कागदपत्रे जोडली असून, ओंबासे यांनी खोटी माहिती दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या मते, नॉन-क्रिमी लेयर श्रेणीसाठी आवश्यक असलेली आर्थिक आणि सामाजिक स्थिती दर्शवणारी खरी माहिती न देता, खोट्या कागदपत्रांच्या आधारे हे प्रमाणपत्र मिळवले गेले.
तक्रारीच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या सार्वजनिक तक्रार मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी पूजा खेडकर प्रकरणानंतर प्रशासनातील बनावट दस्तऐवज वापरण्याच्या प्रकारांकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.
कागदपत्रे योग्यच, सर्व उत्तरे देऊ
मला शासनाकडून पत्र मिळाले. मी सादर केलेली कागदपत्रे योग्यच आहेत. पत्राद्वारे जी विचारणा करण्यात आली त्याची उत्तरे देणारच. – डॉ. सचिन ओम्बासे, महापालिका प्रशासक