राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यातच मुंबईमध्ये किरकोळ वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव पश्चिममधील भगतसिंग नगर भागात सोमवारी सकाळी दारुसाठी पैसे न दिल्याने वसीम शेख याने आपल्या पत्न
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वसीम शेख व त्याची पत्नी गौशिया शेख (वय 25) हे दोघे गोरेगाव पश्चिमेच्या भगतसिंग नगर क्रमांक 2 येथे राहत होते. वसीमला दारूचे अतिव्यसन असून, त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद होत असत. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वसीमने दारूसाठी गौशियाकडे पैसे मागितले. तिने नकार दिल्यावर रागाच्या भरात त्याने तिचा गळा आवळून खून केला.
दोन तासांत पोलिसांनी केली अटक
हत्या केल्यानंतर वसीम घरातून फरार झाला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपी रेल्वे मार्गाने पळून जाणार असल्याची माहिती मिळताच बांगूरनगर पोलिसांनी राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरात सापळा लावला. अवघ्या दोन तासांत, दुपारी सुमारे बाराच्या सुमारास, आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल ठाकरे, निरीक्षक अमित शितोळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय सरोळकर, रंधे, उपनिरीक्षक पियुष टारे आणि सायबर विभागाचे सहाय्यक निरीक्षक विवेक तांबे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, या अमानुष हत्येमुळे गोरेगाव परिसरात खळबळ उडाली असून, दारूच्या व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या घटनांमध्ये आणखी एक दुर्दैवी भर पडली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.