बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीतील मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली. मात्र, यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. आज मतमोजणी प्रक्रियेला सकाळीच सुरुवात झाली असून
.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले होते. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘निळकंठेश्वर पॅनल’ आणि भाजप नेते चंद्रराव तावरे यांच्या ‘सहकार बचाव पॅनल’मध्ये थेट लढत आहे. या दोन्ही पॅनलने एकमेकांवर चिखलफेक करत ही रंगत आणखीनच वाढवली होती. त्यात ‘सहकार सहकार बचाव पॅनल’ने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (पीडीसीसी) रात्री 11 वाजेपर्यंत बँक सुरू ठेवल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पीडीसीसी बँक बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत होती सुरू
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू असताना पीडीसीसी बँक बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. त्यावेळी बँकेत माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदार याद्या आढळल्या. यावेळी अजित पवारांचे पीए सुनील मुसळे, व मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारीही तिथे आढळून आले. हे दोन्ही बँकेत का उपस्थित होते? व ही बँक रात्री उशिरापर्यंत का सुरू होती? असा सवाल चंद्रराव तावरे यांनी उपस्थित केला होता. त्यांनी या बँकेच्या माध्यमातून मतदारांना पैशाचे वाटप होत असल्याचाही आरोप केला होता.
शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांनीही व्यक्त केला होता संताप
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते युगेंद्र पवार यांनीही या प्रकारावर संताप व्यक्त केला होता. ते म्हणाले होते की, बँकेची वेळ 5 वाजेपर्यंतची असते. त्यानंतरही ही बँक रात्री उशिरापर्यंत का सुरू होती? त्या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांच्या याद्या आढळल्यात. त्या याद्या तिथे कशा पोहोचल्या? सहकारी संस्था, शिक्षण संस्था याच्या याद्याही तिथे होत्या. बँकेचा लोड वाढला असावा. त्यामुळे ती रात्री 11 पर्यंत उघडी ठेवण्यात आली असावी. नजिकच्या काळात पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. हे राजकारण बदलले पाहिजे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले होते.