मोफत साडी देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेकडील ३२ हजारांची रोकड, दागिने, मोबाइल असा ८५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविल्याची घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी भागात घडली.
.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खडकी भागात राहायला आहेत. त्या बोपोडी चौकातून खडकीकडे दुपारी दीडच्या सुमारास निघाल्या होत्या. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. ‘पालखी आगमनानिमित्त एका मंडळाकडून महिलांना मोफत साडी वाटण्यात येत आहे. तुम्ही श्रीमंत दिसतात. साडी हवी असल्यास दागिने, रोकड, मोबाइल पिशवीत ठेवा’, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांना केली. चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी पिशवीतून ३२ हजारांची रोकड, दागिने, मोबाइल असा मुद्देमाल लांबविला. पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.
पोलिसांनी तडीपार गुंडाला पकडले
पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला गुन्हे शाखेने कोथरूड भागात पकडले.अक्षय शांताराम सावंत (वय ३०, रा. शिवणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सावंत याला शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. कोथरूड येथील सागर कॉलनीमध्ये सावंत हा त्याच्या काकाच्या घरी आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सागर कॉलनीत सापळा लावला. पोलिसांना पाहताच तो पळाला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. सावंत याला ११ ऑक्टोबर २०२३ रोजी दोन वर्षांसाठी पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या आदेशाचा भंग करुन तो शहरात आला होता. त्याला कोथरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगराव पवार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहायक फौजदार पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारू, पोलिस कर्मचारी अमोल काटकर, विशाल भिलारे, अक्षय गायकवाड, अर्चना वाघमारे आणि पथकाने ही कामगिरी केली.