रोहित्रांच्या वितरण पेट्यांचे उघडे दरवाजे केले बंद: मिनी पिलरला बसवले झाकण, सुरक्षिततेसाठी महावितरणची शहरात मोहीम – Chhatrapati Sambhajinagar News


विद्युत यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी महावितरणने शुक्रवारी (20 जून) विशेष मोहीम राबवून शहरातील दोनशेहून अधिक रोहित्रांच्या वितरण पेट्यांचे उघडे दरवाजे बंद केले. विविध ठिकाणी मिनी फिडर पिलरला झाकण बसवून सुरक्षित करण्यात आले.

.

ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासोबतच विद्युत यंत्रणा सुरक्षित ठेवण्याचे काम महावितरण करते. तथापि, ‍विविध कारणांनी अनेकदा डीपीवरील वितरण पेट्या व मिनी फिडर पिलरचे दरवाजे उघडे व तुटलेले दिसतात. आता पावसाळ्यात सुरक्षा उपाययोजना म्हणून उघड्या वितरण पेट्या व पिलरचे दरवाजे बंद करण्यासाठी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर शहरात मोहीम राबविण्यात आली. महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या संकल्पनेतून अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता प्रसाद महातोले, महेंद्र देशमुख यांच्यासह अभियंते व कर्मचाऱ्यांनी मोहीम यशस्वी केली.

शहर-1 विभागातील शहागंज व वाळूज उपविभागांतर्गत नारळीबाग, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, फाजलपुरा, असमत रुग्णालय लेबर कॉलनी, जव्हेरी बाजार सराफा, एसटी कॉलनी फाजलपुरा, मोरे चौक वाळूज आदी ठिकाणावरील वितरण रोहित्रांचे पेट्यांचे दरवाजे बंद करण्यात आली तसेच मिनी फिडर पिलरला झाकणे बसवून ती सुरक्षित करण्यात आली. शहर-2 विभागातील गारखेडा, सिडको, चिकलठाणा व क्रांती चौक उपविभागांतर्गत विविध ठिकाणी वितरण पेट्यांचे उघडे दरवाजे बंद करण्यात आले.

नागरिकांना कुठे उघडी अथवा धोकादायक वितरण पेटी आढळली तर त्वरित त्याची माहिती महावितरणच्या संबंधित शाखा कार्यालयास अथवा 1912, 1800-212-3435 अथवा 1800-233-3435 या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कॅप्शन : छत्रपती संभाजीनगर शहरात उघड्या वितरण पेट्यांचे दरवाजे बंद करताना महावितरणचे तंत्रज्ञ. तसेच मिनी पिलर वेल्डिंगसह रंगवून सुरक्षित करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24