हिंगोली पालिकेने उभारलेल्या रोपवाटिकेत तब्बल ८० हजार देशी झाडांची रोपे पाहून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शनिवारी ता. २१ पालिका प्रशासनाचे कौतूक केले. या शिवाय गांडूळखत निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. पालिकेने जास्तीत जास्त रोपांची लागवड
.
हिंगोली पालिकेने नांदेड रोड भागात संसदरत्न माजी खासदार राजीव सातव सभागृहाच्या पाठीमागे मोकळ्या जागेत रोपवाटीका तयार केली आहे. रोपवाटीकेच्या देखभालीसाठी दोन स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. रोपवाटीकेत तयार झालेल्या रोपांची शहरात लागवड करून त्याचे संगोपन केले जाते.
दरम्यान, यावर्षी या रोपवाटीकेत ८० हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने चिंच, आवळ, कडुलिंब, पिंपळ, वड, गुलमोहर, बहावा, कदंब, अर्जून या रोपांचा समावेश आहे. सर्व देशीवाणाची रोपे तयार झाली असून मोठा पाऊस झाल्यानंतर या रोपांची लागवड केली जाणार आहे. या रोपांसाठी गांडूळखत निर्मिती प्रकल्प देखील उभारण्यात आला आहे. सुमारे ४५ खड्डे असलेल्या या प्रकल्पासाठी शहरात गोळा केलेला ओला कचरा, तसेच भाजी मंडईतील कचरा गोळा करून या ठिकाणी टाकला जात आहे.

दरम्यान, आज जिल्हाधिकारी राहुल गुुप्ता यांनी या रोपवाटीकेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, चंदू लव्हाळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी मुंडे यांनी रोपवाटीकेबाबत माहिती देऊन यावर्षी शहरातील मोकळ्या जागेत ३० ते ३५ हजार रोपांची लागवड केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी रोपवाटीकेचे काैतूक करून रोपवाटीकेतील रोपे नागरीकांनाही उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. पुढील काळात जास्तीत जास्त रोपे तयार करण्याच्या सूचना करीत जास्तीत जास्त ठिकाणी अटल घनवन उभारणीच्या सूचनाही त्यांनी केल्या.