Infrastructure News Navi Mumbai: सिडकोकडून बांधण्यात येत असलेल्या खारघरच्या जलवायू विहार ते नेरूळ जलवाहतूक जेट्टीपर्यंतचा कोस्टल रोड बेलापूर परिसरात डबल डेकर करता येईल का याचा विचार करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हा कोस्टल रोड बेलापूर परिसरात डबल डेकर केल्यास नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी परिसरातून नवी मुंबईकडे येणाऱ्या वाहनांमुळे होणारी संभाव्य वाहतूककोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.
सिडकोला सूचना
नवी मुंबई महापालिका आणि सिडकोसंदर्भातील विविध प्रश्नांवर तोडगा काढून ते मार्गी लावण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांकडे गुरुवारी एक बैठक पार पडली. यात बैठकीत नवी मुंबईतील विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यावर उपाय सुचविताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी खारघर-नेरूळ कोस्टल रोड बेलापूर सेक्टर 15 परिसरात डबल डेकर करता येईल, अशी सूचना सिडकोस केली.
संदीप नाईकांच्या भूमिकेकडे लक्ष
कोस्टल रोडसाठी 8.22 हेक्टर क्षेत्रावरील 1182 परिपक्व खारफुटीची झाडे बाधित होणार आहेत. पक्ष्यांच्या 72 प्रजातींचा या परिसरात अधिवास असून, त्यापैकी 48 स्थलांतरित आणि 24 स्थानिक पक्षी आहेत. डीपीएस, एनआरआय आणि टी. एस. चाणक्य परिसरात फ्लेमिंगोंची संख्या वाढत आहे. पर्यावरण हानी लक्षात घेऊन माजी आमदार संदीप नाईक यांनी या रस्त्याला विरोध केला होता. मात्र, आता मुख्यमंत्री फडणवीस यांनीच हा रस्ता डबल डेकर करण्याची सूचना केल्याने ते कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांचा चाणाक्षपणा
खारघर ते नेरूळ जेट्टी कोस्टल रोड बेलापूरमध्ये न आणता तो सेक्टर 11 मधून थेट विमानतळाच्या दिशेला न्यावा, अशी मागणी वनमंत्री गणेश नाईक यांनी केली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी ही सूचना केली. त्यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी विमानतळ व जेएनपीएमुळे बेलापूर परिसरात बॉटल लिंक होऊन नये यासाठी तो बेलापूर परिसरात डबल डेकर करण्याची सूचना केली.
नेमका काय होणार फायदे?
प्रस्तावित रस्ता पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त कनेक्टिव्हिटी मिळून पाम बीच रोडसह सायन-पनवेल महामार्गावरील जड-अवजड वाहनांची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. शिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी आणि अटल सेतूलाही नव्या रस्त्याचा फायदा होणार आहे. शिवाय बेलापूरच्या समुद्रात मेरिटाइम बोर्डाने तीन शिपयार्ड प्रस्तावित केले आहेत.
अटल सेतू, विमानतळ, जेएनपीटी 3 आणि शिपयार्डमध्ये ये-जा करणारी सर्व वाहतूक बेलापूर परिसरातून जाणार असल्याने वाहतुकीची मोठी वर्दळ वाढून संपूर्ण परिसर कोंडीत अडकणार आहे. मात्र, हा रस्ता डबल डेकर केल्यास ही कोंडी कमी होऊन स्थानिकांना दिलासा मिळणार आहे. यामुळे उरण फाटा परिसरातून सायन-पनवेल महामार्गाकडे जाण्यासाठी संभाव्य वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका होण्यास मदत होईल, असा हेतू रस्ता डबल डेकर करण्यामागे आहे.