Mumbai Local Accident: ‘हे सगळं निराशाजनक’ म्हणत राज ठाकरेंनी संपवली पत्रकार परिषद, म्हणाले ‘उद्धव-राज एकत्र येणार..’


Raj Thackeray on Mumai Local Accident: मुंबईमधील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील जीवघेणा प्रवास चर्चेत आला आहे. दरम्यान शहरांवर बाहेरुन येणारे आदळणारे लोंढे यामुळेच रेल्वे कोलमडली आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईच्या रेल्वेत रोज अपघात होत आहेत. अपघात झाला नाही असाही एकही दिवस नाही. रेल्वे नेमक चालती कशी हे जगासाठी आश्चर्यच आहे. अनेकदा मुंबईतील लोकांसाठी वेगळं महामंडळ करा सांगूनही काही होत नाही असं राज ठाकरे पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले. 

“या शहरांचं काय झालं हे पाहणं गरजेचं आहे. या सगळ्या शहरांचा विचका झाला आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली उंच इमारती बांधल्या जात आहेत, मात्र रस्ते नाहीत. रस्ते नसल्याने पार्किंग नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी होते.  जर कुठे आग लागली तर अग्निशमन दलाचा बंब आत जाऊ शकत नाही अशी सगळ्या शहरांची व्यवस्था आहे. आपल्याकडे शहर नियोजन नावाची गोष्टच नाही. शहरांवर बाहेरुन येणारे आदळणारे लोंढेच यामुळेच रेल्वे यामुळेच कोलमडली आहे,” असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 
 
पुढे ते म्हणाले, “रेल्वे. वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. लोकांना चालण्यासाठी फुटपाथ नाही. वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय, जातंय नाहिती नाही. मेट्रो, मोनो इतर सोयीसुविधा याने प्रश्न सुटणार नाहीत. मुंबईत मोनो, मेट्रो असताना गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का? मोने, मेट्रो कोण वापरतंय हे पाहण्यास कोणी तयार नाही. निवडणुका, प्रचारात सगळे गुंतले आहेत. शहरं म्हणून याकडे पाहण्यास कोणी तयार नाही. शहरावर बोलल्यास त्याला किंमत नाही”. 

“उद्धव-राज एकत्र येण्यावर जेवढी चर्चा झाली तेवढा वेळ मृत्यू झाले आहेत त्यांच्या बातम्या लागणार आहेत का. कशाला महत्व द्यायचं हेच समजेनासं झालं आहे. प्रसारमाध्यमांनी शहरातील समस्यांकडे लक्ष वेधलं पाहिजे. इतर सर्व किरकोळ गोष्टी आहेत. दुर्दैव असून, केंद्र सरकारने याकडे तातडीने लक्ष दिलं पाहिजे”, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. 

“प्लॅटफॉर्मवर गर्दी पाहिली तर लोक कसे आत शिरतात, बाहेर येतात हा प्रश्नच पडतो. कॉलेजमध्ये असताना दोन वर्षं मीदेखील रेल्वेने प्रवास केल्याने मला त्याची कल्पना आहे. संध्याकाळी मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर शिरुन दाखवा. गर्दी नव्याने निर्माण झालेली नाही. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा कशाला द्यावा, याउलट तिथे जाऊन परिस्थिती पाहावी, सुधारणा करावी,” असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे. 

“दरवाजे बंद केले तर आत गुदमरुन मरतील. एक जागा बाहेर पडण्यासाठी, एक जागा आत जाण्यासाठी हवी. आपल्या देशात माणसाची किंमत नाही. जगात इतर कुठे घडलं असतं तर कसं दिसलं असतं. हे मंत्री परदेशात जातात, ते नेमके काय घेऊन येतात. तेथील रेल्वे नाही, पण किमान तेथील विचार तरी आणा. हे सगळं निराशाजनक आहे,” अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24