‘रेल्वेला पैसेही द्यायचे आणि रेल्वेने जीवही घ्यायचा, हे…’; मुंब्रा अपघातानंतर आव्हाड संतापून म्हणाले, ‘भारतातील सर्वात…’


Mumbai Train Accident Mumbra Station: मुंब्र्याजवळ दोन धावत्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांची एकमेकांना धडक लागून अनेक प्रवासी ट्रॅकवर पडले. या अपघातामध्ये पाच प्रवाशांच्या मृत्यूची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत थेट रेल्वेच्या कामाईचा मुद्दा उपस्थित करत हल्लाबोल केला आहे. आव्हाड यांनी सर्वसामान्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवताना मागील बऱ्याच काळापासून दिव्यातून लोकल सोडण्याची मागणी रेल्वे का मान्य करत नाहीये असा सवालच उपस्थित केला आहे.

अनेक वर्षांपासून मागणी करतोय…

रेल्वेमध्ये पडून पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर आव्हाड यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन संताप व्यक्त केला आहे. “धावत्या रेल्वेगाडीतून पडून झालेले मृत्यू हे वेदनादायक आहेत. लोकल ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळेतील प्रवास हा नेहमीच जीवघेणा असतो. रेल्वेचा न सुधारण्याचा अट्टाहास हा अनेकांचा जीव घेऊन जातोय,” असं आव्हाड म्हणालेत. तसेच पुढे बोलताना आव्हाड यांनी, “प्रवाशांनी अनेकवेळा मागणी केली आहे की दिवा टर्मिनेटींग लोकल ट्रेन सुरू करावी. गेल्या दशकात दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरातील लोकसंख्या हजार पटीने वाढली आहे. मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या हजार पटीने वाढली आहे. लोकल ट्रेनच्या फेऱ्या प्रवाशी संख्येच्या तुलनेत वाढल्यात का? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे,” असं आव्हाड म्हणाले आहेत.

सर्वात जास्त महसूल हा मुंबई लोकलमधून मिळतो

“भारतातील सर्वात जास्त महसूल हा मुंबई लोकलमधून मिळतो. रेल्वेला पैसेही द्यायचे आणि रेल्वेने जीवही घ्यायचा, हे ऐकायलाही योग्य वाटत नाही. रेल्वेने काहीतरी उपाययोजना कराव्यात,  एवढीच सर्व प्रवाशांची मागणी आहे. दिवा टर्मिनेटींग लोकल ट्रेन हा त्यावरील एक छोटासा उपाय आहे,” असं आव्हाड म्हणाले.

रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

“सामान्य मुंबईकर जीव मुठीत घेऊन लटकत ट्रेनमधून पोटापाण्यासाठी प्रवास करतात. हा लोकल ट्रेनचा प्रवास आता मुंबईकरांच्या जीवावर उठला आहे. रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे. महायुती सरकारने आता तरी मुंबई लोकल ट्रेनच्या प्रश्नांबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा,” असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. “मुंबईतील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करता येत नाही, गर्दीच्या वेळी अधिकच्या ट्रेन सोडल्या जात नाही, तिथे अधिक लाईन टाकल्या जात नाही, ट्रेनला उशीर झाला की गर्दी अजून वाढत जाते अशा मुंबई लोकलच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी रेल्वेमंत्री फक्त रिल्स बनवण्यात व्यस्त असतात,” असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24