सेनगाव तालुक्यातील घोरदरी येथील जबरी चोरी प्रकरणात पोलिस यंत्रणा मागील चार दिवसांपासून गावात ठाण मांडून बसली आहे. आता पर्यंत पोलिसांनी १५ जणांची चौकशी केली असून कुठलेही धागेदोरे हाती लागत नसल्याने पोलिसांनी आता विदर्भाकडे मोर्चा वळवला आहे. दुसरीकडे घ
.
सेनगाव तालुक्यातील घोरदरी गावालगत असलेल्या माणिक साबळे यांच्या घरी शुक्रवारी ता. ६ पहाटे चार चोरट्यांनी हाती चाकू घेऊन जबरी चोरी केली. यामध्ये चोरट्यांनी माणिक साबळे व त्यांचा मुलगा अशोक साबळे यांना मारहाण केली. तर महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिने व घरातील पेटीत ठेवलेली ३.५० लाख रुपयांची रोख रक्कम असा ४.१७ लाखांचा मुद्देमाल पळवला. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह सेनगाव पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते. मात्र घटनास्थळी कुठलीही वस्तू मिळाली नसल्याने श्वान पथकाचा उपयोगच झाला नाही. या प्रकारानंतर पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व स्थानिक सेनगाव पोलिसांचे पथक स्थापन करून त्यांना तपासाचे आदेश दिले.
या प्रकरणात पोलिसांचे पथक मागील चार दिवसांपासून गावात ठाण मांडून आहेत. पोलिसांनी परिसरातील काही संशयीतांची माहिती घेतली. या शिवाय आता पर्यंत १५ जणांची चौकशी केली. मात्र या चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आता पोलिसांनी विदर्भातून अशा प्रकारे जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
दरम्यान, जोपर्यंत या घटनेचा तपास लागत नाही तोपर्यंत माघारी यायचे नाही असे स्पष्ट आदेशच पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी दिले असून पुढील दोन दिवसांत महत्वाचे धागेदोरे हाती लागतील असा दावा सूत्रांनी केला आहे.