निवडणूक आयोग मोदी – शहाच्या पिंजऱ्यातील पोपट: निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नाला भाजप का उत्तर देत आहे? – राऊत – Mumbai News



शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी निवडणूक आयोग, भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. निवडणूक आयोग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पिंजऱ्यातील पोपट झाला आहे

.

राहुल गांधी यांनी शनिवारी एका संपादकीय लेखाद्वारे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा आरोप फेटाळून लावत त्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेद्वारे या घटनाक्रमावर भाष्य करताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नाला भाजप का उत्तर देत आहे? असा कळीचा प्रश्न उपस्थित केला.

भाजपला EC च्या चेहऱ्यावरील धूळ पुसण्याचा ठेका मिळाला का?

संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची भूमिका उर्दुला विरोध करण्याची आहे. योगी आदित्यनाथ किंवा त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांनी उर्दुला विरोध केला. पण फडणवीस यांनी राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी उर्दू शायरीला आधार घेतला. ही जुनी शायरी आहे. ती शाळेतील मुलेही वापरतात. मूळ मुद्दा बाजूलाच राहत आहे. तुम्ही निवडणुकीच्या चेहऱ्यावरील धूळ का पुसत आहात? ही धूळ स्वतः आयोगाने पुसली पाहिजे. त्यांना आयोगाच्या चेहऱ्यावर जी काही धूळ बसली आहे किंवा सर्व राष्ट्रीय पक्ष व जगभरातून जी चिखलफेक होत आहे ती साफ करण्याचा ठेका मिळाला आहे का?

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेत. भाजपला नाही. उत्तर राजीव कुमारांपासून ज्ञानेशकुमारांपर्यंतच्या लोकांनी द्यायचे आहे. हे प्रश्न केवळ निवडणुकीपुरते नाहीत. गेल्या 10 वर्षांत आयोगाने जे कांड केलेत, ते मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या हातात देण्यापासून मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या हयातीत अजित पवारांना देण्याचे काम हे अमित शहांच्या दबावाखाली झाले. हा सुद्धा निवडणूक जिंकण्याचाच एक भाग होता. याचे सुद्धा आयोगाला उत्तर द्यावे लागतील. फडणवीस यांची उत्तरे केवळ थातूरमातूर आहेत. छाछुगिरी आहेत. तुम्ही आयोगाची अथॉरिटी नाहीत.

EC मोदी – शहाच्या पिंजऱ्यातील पोपट

ते म्हणाले, गेल्या 10 वर्षांत निवडणूक आयोग मोदी- शहा यांच्या पिंजऱ्यातील पोपट झाला आहे. पोपट विठू विठू तरी बोलतो. पण हा पोपट तेवढाही बोलत नाही. आयोग हा अकबर बादशहाचा पोपट झाला आहे. तो जिवंत आहे की मेला? हे सांगण्याचीही कुणाची हिंमत होत नाही. महाराष्ट्रात याला उत्तर द्या, त्याला उत्तर द्या असे जे प्रकार सुरू आहेत, ती सर्व ढोंग व सोंग आहेत. राज्याच्या व केंद्राच्या निवडणूक आयोगाने आपला आत्मा विकला आहे. आयोग भाजपची एक शाखा म्हणून काम करत आहे हे आता लपून राहिले नाही. आम्ही भाजप व सरकारवर आरोप केला तर राजीवकुमार नावाचे निवडणूक आयुक्त उत्तर देतात.

निवडणूक आयोग हे एक घटनात्मक पद आहे. त्यांनी निष्पक्षपणे या देशातील निवडणुका घ्यायच्या असतात. मोदी – शहा सांगतील त्या पद्धतीने निवडणुका घ्यायच्या नसतात. हे फडणवीस यांनी लक्षात घेतले पाहिजे. फडणवीस वकील असतील, पण कायद्याचा अभ्यास त्यांच्यापेक्षा जास्त आमचा आहे, असे संजय राऊत म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24